आपण सारे भाऊ 97
‘विमलताई विमलताई!’ सर्वांनी टाळया पिटल्या. परंतु विमलताईबरोबर हा कोण? अरे, हा तर मधू. कृष्णनाथाचा मित्र!
‘काय रे मधू, तू कधी सुटलास?’
‘तुला दादही नाही का? नवीन स्वराज्यवाडीत वर्तमानपत्रे नाही वाटते येत? स्वराज्यवाडी जगाच्या मागे नये राहता कामा! अरे, मी परवा सुटलो आणि एकदम तुझ्याकडे आलो! तुरुंगात तुझ्याविषयी बरेच ऐकले. मनात ठरवून ठेवले की आधी तुझ्या या स्वराज्यवाडीत यायचे. सर्व देशाला स्वराज्य केव्हा मिळेल ते खरे! तू तर या शेतकरी बंधूंना स्वराज्य देऊनच टाकले आहेस! विमलताई सारे सांगत होत्या. त्यांची माझी अचानक भेट झाली!’
‘तू स्टेशनवर नव्हतीस?’
‘मी पुढच्या स्टेशनवर गेले. झोप लागली होती आणि हे तुमचे मित्रही पुढच्या स्टेशनवर उतरले. तेथे स्वराज्यवाडीची चौकशी करु लागले. मी म्हटले, चला, तुम्हांला घेऊन जाते. फाटयापर्यंत मोटारीने आलो. पुढे पायी आलो.
‘मधू, येथे आता नंबरी बौध्दिक सोड! तुझी वाणी ऐकून लोक खूष होतील. नवीन कल्पना दे. योजनापूर्वक उत्पादनाच्या कल्पना सांग. मी कधी कधी या मित्रांजवळ तुझ्याविषयी बोलत असे. तू आलास. आजच्या आनंदाच्या दिवशी आलास. हे माझे वडील भाऊ रघुनाथराव! ही माझी वैनी, रमावैनी! ही त्यांची मुले! आज पंधरा वर्षांनी भाऊ भावाला परत भेटला आहे. ग्रहण संपले. प्रेमाचा सूर्य पुन्हा उगवला!’
‘आणि मी नाही का तुझा भाऊ? तुम्ही का दोघेच भाऊ!’ मधूने हसत विचारले.
‘तूही भाऊच. तू भावापेक्षाही अधिक आहेस. मी आताच दादांना म्हटले की, आता आपण दोन भाऊ नाही राहिलो. हे सारे शेतकरी आपले खरोखर भाऊच!’
‘कृष्णनाथ, व्याख्यान्त ‘बंधुभगिनींनो’ असे पटकन् उच्चारण्यात येते; परंतु आपण सारे भाऊ असे म्हणण्याचा तुलाच अधिकार आहे. ये, तुला हृदयापाशी धरु दे. तुझ्यातील हे विशाल बंधुप्रेम, ही खरी मानवता मलाही माझ्यात घेऊ दे! अनुभवू दे!’
दोघा मित्रांनी एकमेकांस हृदयाशी घट्ट धरले!