आपण सारे भाऊ 15
‘वैनी!’ कृष्णनाथाने हाक मारली.
रमा आपल्या नादात होती. तिने मुद्दाम ओ दिली नाही. कृष्णनाथाने पुन्हा हाक मारली.
‘वैनी, उद्या मी वनभोजनास जाणार आहे. दादाने जा म्हणून सांगितले. मास्तर आहेत बरोबर. वर्गातील सारी मुले येणार आहेत.’
‘त्यांनी सांगितले आहे ना जायला?’
‘हो.’
‘मग जा.’
‘पण तू फराळाला देशील ना?’
‘फराळाला कशाला?’
‘तेथे आम्ही फराळ करु. सारी मुले आपापल्या घरुन आणणार आहेत; देशील का?’
‘आता फराळाचे कोण करणार? आज स्वयंपाकाची बाईसुध्दा येणार नाही. कोण देईल फराळाचे करुन?’
‘तू दे ना करुन.’
‘माझ्याच्याने नाही होणार बाबा. काही नको जायला वनभोजनाला. चांगले घर आहे, आणि वनभोजनाला कशाला? वनात जायचे डोहाळे कशाला? घरात ठेवा.’
‘वैनी, देशील का काही तरी? घरात चिवडा आहे. तू पोळया व भाजी दे. फार नको काही.’
‘मी एकदा नाही म्हणून सांगितले ना? पुन्हा विचारु नकोस.’
‘दादाने जा म्हणून सांगितले.’
‘त्यांच्याजवळ माग फराळाचे. द्या म्हणावे बाजाराचे आणून. मला नाही हे नसते थेर आवडत. हो चालता.’