आपण सारे भाऊ 90
‘ते मी विसरलेच. परंतु या गोष्टींतही तो लाकडी पायच होता. त्याला पल्लव फुटले. तेच मी सांगत होते की, या झाडामाडांत किती प्राणमयता असते!’
‘विमल, जीवन जसजसे अधिक उत्क्रांत होत गेले, तसतसे नाना प्रकारचे त्यात फरक होत गेले. आणि मानवी जीवन तर फारच गुंतागुतीचे, हळुवार आहे.’
‘मला तुमचे शास्त्रज्ञान आता नका पाजू! मल सृष्टीचे हे काव्य बघू दे!’
‘शास्त्रज्ञान म्हणजेही काव्य आहे!’
‘सृष्टीच्या काव्यावरचे भाष्य म्हणजे तुमचे शास्त्र. तुम्ही आता जा. माझे हार गुंफणे राहील.’
‘तू फुले तोडीत नव्हतीस म्हणून मी आलो. माझे काम आता संपले. मी जातो. मग येतो तुझ्या मदतीला आणि गुंफू फुलांचे हार!’
‘तुरुंगात जाऊन तुम्ही बडबड करायला शिकलेत!’
‘उद्या कृतीही करावयाची आहे. विमल, हे सारे वैभव सोडायला तू तयार आहेस?’
‘सोडायचे कोठे? शेतात फुलवायचे. सर्वांनी मिळून भोगायचे.’
कृष्णनाथ, तू काळजी करु नको. तुझी विमलही तुरुंगात खरी मानव झाली आहे!’
कृष्णनाथ झाडायला गेला. अंगणी झाडून तो काही भांडी घाशीत बसला, विमल तिकडे हार गुंफित बसली. कृष्णनाथ अद्याप का नाही आला म्हणून ती पाहायला गेली, तो तो भांडी घाशीत होत नि गाणे गुणगुणत होता. तो अभंग होता,
‘अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक’
हेच चरण तो घोळून म्हणत होता. विमल पाहात होती सुंदर सहृदय दृश्य!
‘कृष्णनाथ!’
‘कोण विमल? तू येऊन उभी राहिली होतीस वाटते?’