आपण सारे भाऊ 75
आता सायंकाळ झाली. अंधार पडू लागला. यात्रेत शेकडो दिवे लागले, ती यात्रा अधिकच सुंदर दिसू लागली. लोकांचीही खूप गर्दी होऊ लागली. आणि त्या मुलाचा नि आईचा हात सुटला. आईबापाची व बाळाची ताटातूट झाली. तो भिरीभिरी हिंडू लागला. सर्वत्र पाहू लागला. परंतु त्याला आई कोठे दिसेना. ‘आई, आई अशा हाका मारीत तो हिंडू लागला आणि शेवटी रडू लागला. रडत रडत तो जात होता, परंतु कोण देणार त्याच्याकडे लक्ष? जो तो आपल्याच ऐटीत होता. रडत रडत तो मुलगा त्या खेळण्यांच्या नि खाऊच्या दुकानांवरुन जाऊ लागला. एक लहान बाळ रडत चालला आहे हे पाहून ते खेळणीवाले द्रवले.
‘अरे बाळ, का रडतोस? इकडे ये. उगी. रडू नको. तुला खेळणे हवे का? हे घे. कोणते हवे असेल ते घे. ये!’ परंतु बाळ त्या खेळण्यास हात लावीन.
‘मला नको खेळणे. माझी आई कोठे आहे?’ एवढेच रडत रडत तो म्हणाला. त्या खेळण्यांकडे ढुंकूनही त्याने पाहिले नाही. तो तसाच आई, आई ग अशा हाका मारीत पुढे चालला, आता त्या खाऊवाल्या दुकानदारांनी त्याला हाक मारली.
‘अरे बाळ, का रडतोस? इकडे ये. उगी, रडू नकोस. तुला खाऊ हवा का? हा घे. कोणता हवा असेल तो घे. ये!’ परंतु बाळ त्या खाऊला हात लावीना.
‘मला नको जा खाऊ. माझी आई कोठे आहे?’ एवढेच रडत रडत तो म्हणाला, त्या खाऊकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही. तो तसाच ‘आई, आई ग’ अशा हाका मारीत पुढे चालला. ज्या खेळण्यांसाठी, ज्या खाऊसाठी पूर्वी तो रडत होता, ती खेळणी, तो खाऊ, त्याच्यासमोर ठेवण्यात आला, परंतु त्याने त्यांना स्पर्शही केला नाही.
असे सांगून कृष्णनाथ थांबला. थोडा वेळ कोणीच बोलले नाही. शेवटी अधीर होऊन विमलने विचारले, ‘पुढे त्या मुलाचे काय झाले? भेटली का त्याला आई?’
‘गोष्ट इतकीच आहे. येथेच गोष्टीचा शेवट आहे.’
‘इश्श्य! असा काय शेवट?’
‘हा शेवटच कलात्मक आहे. केवढा तरी अर्थ या गोष्टीने सूचित केला आहे! तू सांग या गोष्टीचा भाव!’
‘सांग ना भावार्थ! आढेवेढे नकोत.’