आपण सारे भाऊ 48
‘बाबा, मीसुध्दा कामच करीत आहे. कुणी हे नको का करायला? कृष्णनाथाला फोनो फार आवडतो. त्यानेच लावायला सांगितला. आणि बाबा, तुम्ही तर आरामखुर्चीतच आहात. मी थोडे तरी काम करीत आहे.’
‘अग, मी आता म्हातारा झालो. विश्रांती घेण्याचेच माझे दिवस. तुझे एकदा लग्न करुन दिले म्हणजे सुटलो!’
‘आणि कृष्णनाथाचे कोण करील?’
‘मुलींच्या लग्नाला त्रास पडतो; मुलांच्या नाही.’
‘मला मुळी लग्नच करायचे नाही.’
‘फार छान! एक कटकट मिटली!’
‘बाबा, तुम्ही लग्नाचे बोलणार असाल तर मी आपली जाते.’
अग, गंमत केली. इतक्यात लाजायला काय झाले? आणि काय रे कृष्णनाथ, तुला एक विचारायचे आहे.’
‘काय बाबा?’
‘तुला एखाद्या चांगल्या ठिकाणी शिकायला ठेवले तर? मुलांना छात्रालयात शिकायला ठेवावे या मताचा मी आहे. तेथे चांगल्या सवयी लागतात. सहकार्याची वृत्ती बळावते. सर्वांशी मिळूनमिसळून वागायला मनुष्य शिकतो आमच्या या विमललासुध्दा मी कन्या गुरुकुलात ठेवणार होतो. परंतु मला एकटयाला अगदीच करमणार नाही म्हणून तो बेत शेवटी सोडून दिला.’
‘बाबा, कुठे पाठवणार कृष्णनाथाला?’
‘एका प्रसिध्द छात्रालयात.’
‘कोठे आहे ते?’
‘तिकडे मुंबईच्या बाजूला समुद्रकाठी आहे. बोर्डी त्या गावाचे नाव. मी मागे एकदा तिकडे सहज गेलो होतो. तेथे शारदाश्रम नावाचे छात्रालय आहे. शाळेचेच छात्रालय. फार सुरेख व्यवस्था तेथे आहे.’ कृष्णनाथाला तेथे पाठवावे असे माझ्या मनात आहे. त्याच्या अंगच्या गुणांची तेथे सुरेख वाढ होईल. जाशील का कृष्णनाथ?’