आपण सारे भाऊ 86
‘आणि त्यांच्या त्यागाने, त्यांच्या पुण्याईनेच संस्था चालतात. हजारोंच्या व्याख्यानांपेक्षा काँग्रेसमधील अशा एकाचे उदाहरण जनतेवर अधिक परिणाम करील; नाही?’
‘जायला हवे तो प्रयोग बघायला.’
‘कोठे राहतो तो अवलिया?’
‘इंद्रपूरला.’
‘बरेच दूर आहे गाव?’
‘आपण असे फिरत जाऊ या. एके ठिकाणी बसणे नको.’
‘चल!’
ते खादीवाले उठले नि गेले. रघुनाथ त्यांचा संवाद ऐकत होता. तोही घरी यायला निघाला. बराच उशीर झाला होता. घरी मुले झोपी गेली होती. रमा दारातच होती.
‘किती उशीर हा! मला काळजी वाटत होती!’
‘पुन्हा दारुकडे गेले, असे वाटले ना?’
‘हो. रागावू नका. मनात आले खरे!’
‘रमा, आपण येथून जायचे. घराचा लिलाव होताच जायचे!’
‘कुठे?’
‘तिकडे इंद्रपूरला!’
‘इतक्या लांब? तिकडे काय आहे?’
‘तेथे गरिबांची एक वसाहत आहे. सारे एकत्र राहतात, एकत्र श्रमतात; पिकेल ते सर्वांचे. जणू एक प्रेमळ कुटुंब!’
‘आपल्याला घेतील का त्यांच्यात?’