आपण सारे भाऊ 45
माधवराव कृष्णनाथाला घेऊन घरात आले. त्याला खरेच ताप आला होता. हात धरुन त्यांनी त्याला वर नेले आणि सुरेखशा गादीवर निजविले. तो विमल वर आली.
‘बाबा, बराच आहे ताप! कपाळ दुखते का रे बाळ?’
‘तू उगीच काही विचारु नकोस. तुझी सारखी बडबड. तो अगदी गळून गेला आहे. त्याला पडू दे. आत्याबाईला कोको करायला सांग जा.’
‘किती कप?’
‘एक कपभर.’
‘मी पण घेऊ?’
‘अग, आता जेवायचे झाले आहे.’
‘या बाळाबरोबर कुणी नको का प्यायला? कोणी पाहुणे आले म्हणजे तुम्ही आपले त्यांच्याबरोबर घेता. या बाळाबरोबर नको का घ्यायला?’
‘तो पाहुणा नाही आता. तो आपल्या घरचाच आहे, समजलीस! त्याला परकेपणा नाही दाखवायचा. जशी तू माझी तसाच तो. जा खाली कोको आण!’
विमल खाली गेली. माधवराव कृष्णनाथाजवळ बसले होते. ते त्याचे अंग चेपीत होते. कृष्णनाथाच्या डोळयांतून पाणी येत होते.
‘रडू नको, बाळ!’
कृष्णनाथ एकदम उठला. त्याने माधवरावांच्या गळयाला मिठी मारली. माधवराव द्रवले. त्यांनी त्याला मांडीवर थोपटले. पुन्हा वर तोंड करुन कृष्णनाथाने सद्गदित होऊन विचारले.
‘तुम्ही नाही ना मला टाकणार? माझे आईबाप मला सोडून गेले, दादाने मला टाकले. तुम्ही नका टाकू!’
‘नाही टाकणार. तू आता माझा आहेस. शीक. मोठ हो. चांगला हो.’
‘शिकेन. चांगला होईन.’