आपण सारे भाऊ 64
‘मधू!’
‘तुझ्याबरोबर पुष्कळ वाचायची इच्छा होती. आता ती अपूर्णच राहणार!’
‘तुरुंगात एकत्र राहू व वाचू.’
‘परंतु लाठीमारात व गोळीबारात मेलो तर?’
‘तर आपण कृतार्थ होऊ! हे जीवन स्वातंत्र्यासाठी अर्पायला मी अधीर झालो आहे!’
‘तुझी उत्कटता माझ्यात येवो!’
‘तूही ज्वालाग्राही आहेस. आज ना उद्या तूही पेट घेशील. आणि ज्वालामुखी भडकला की दगडांचाही वितळून रस होतो. खरे ना? मी जातो!’
बुध्दिमान, भावनामय असूनही संयमी, त्यागी असा मधू निघून गेला. कृष्णनाथाला त्या रात्री झोप आली नाही.
पहिल्या वर्षाची परीक्षा होऊन तो इंद्रपूरला सुटीत गेला. या वेळेच्या सुटीत तो गंभीर असे. त्याने एक चरखा बरोबर नेला होता. तो सूत कातीत बसे. आत्याबाईही सूत कातायला शिकल्या.
‘बाबा, चरखा तुमची करमणूक करील.’
‘देवाचे नाव मला पुरेसे आहे.’
‘परंतु मुखी नाम व हाती काम म्हणजे अधिकस्य अधिक फलं, असे नाही का?’
‘कृष्णनाथ, हा देहाचा चरखाच आता बंद पडण्याची वेळ आली आहे!’
‘बाबा, असे का बोलता?’
‘जे आतून वाटते ते बोलतो.’
‘तुम्ही मरणाच्या गोष्टी नका बोलू.’
‘तुम्ही तरुणांनी तरी मरणाच्या गोष्टींना भिता कामा नये. वॉर्सा शहराच्या रक्षणासाठी पंधरापंधरा वर्षांची मुले उभी राहिली, धारातीर्थी मेली.’
‘उद्या आपल्या देशात स्वातंत्र्याचा लढा सुरु झाला तर बाबा, त्यात मी जाऊ?’