आपण सारे भाऊ 83
‘विचारा ना?’
‘यामुळे देशाला स्वराज्य मिळणार आहे का?’
‘ते स्वराज्यबिराज्य आम्हांला कळत नाही. उपाशी माणसाला खायला मिळणे म्हणजे स्वराज्य!’
‘होय, मीही तीच व्याख्या करतो. ही लढाई संपल्यावर हिंदुस्थानात कोणी उपाशी राहणार नाही असे होईल का? आजच पाहा ना! आपले लोक तिकडे लढत आहेत. त्यांच्या घरी कदाचित् खायला जात असेल. परंतु बंगालमध्ये लाखो लोक दुष्काळात मरत आहेत, त्यांची काय वाट? हे स्वराज्यच का?’
‘मला वाद करायला वेळ नाही. तुम्ही काँग्रेसचे दिसता.’
‘मी काँग्रेसचा असतो तर बाहेर दिसलो असतो का?’
‘अहो, हल्ली सुटताहेत लोक.’
‘ते तुम्हांला माहीत, मला वर्तमानपत्र तरी कोठे मिळते वाचायला?’
‘जात नाही वाचनालयात?’
‘घरातून बाहेर पडायला लाज वाटते.’
‘तुम्ही घरातच मरायचे. सोन्यासारखी आज संधी आहे पोट भरण्याची; परंतु तुमच्याजवळ ना धाडस ना हिंमत! मरा, घरांतच किडयासारखे मरा!’
‘तो गृहस्थ शाप देऊन निघुन गेला. तो निघून गेल्यावर मात्र रघुनाथ विचार करु लागला. उपाशी राहण्यापेक्षा, पोराबाळांची उपासमार पाहण्यापेक्षा गेले लढाईवर म्हणून काय झाले? रमाला विचारावे. तिने दिली संमती तर जावे. वाचलो तर परत येईन. सारे नशिबावर आहे!’
असे त्याचे विचार चालले होते, तो रमा आली.
‘हिला घ्या जरा. मला दळायचे आहे.’
‘तुरुंगातूनसुध्दा दळणे बंद झाले. अणि तू का आता दळणार?’
‘अलीकडे मीच दळते. आणि गरिबांच्या बाया घरीच नाही का दळत?’