आपण सारे भाऊ 63
कृष्णनाथ खेळाडू होता, बुध्दिमान होता, कलावान होता. दिसे सुंदर, बोले सुंदर, उंच, बांधेसूद त्याचे शरीर होते. तोंडावर एक विलक्षण तेज होते. प्रतिस्पर्ध्यास ते दिपवी. स्नेहयांस सुखवी. कृष्णनाथास आपल्यात ओढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुलांनी जंग जंग पछाडले. परंतु कृष्णनाथ डबक्यात शिरला नाही. तो म्हणे, ‘अशा आपापल्या जातीपुरते पाहणा-या संस्थांत मी जगू शकणार नाही; तेथे मी गुदमरेन.’
तो सारे वाची, सारे विचार ऐके. अभ्यास सांभाळून जेवढी विचारसंपदा मिळविता येईल ती तो मिळवीत होता. तो कधी आजारी पडला नाही. त्याचे कपाळ कधी दुखले नाही. शरीराने निरोगी व मनाने, बुध्दीने निरोगी, असा हा नवभारताचा नवयुवक होता. कसलीही क्षुद्रता त्याने आपल्यामनाला लावून घेतली नाही, आणि एवढे करुन तो आनंदी असे. कोणाशी त्याचे वैर नव्हते. विरोधी मतेही हसत हसत सांगेल. तो एकदाच रागावला होता. कोणी तरी महात्माजींची मर्यादेबाहेर टिंगल केली. कृष्णनाथ ताडकन् उभा राहून म्हणाला, ‘तुमची जीभ झडत कशी नाही? महात्माजींशी मतभेद असू शकतील, परंतु कित्येक शतकात होणारी ती एक महान विभूति आहे, हे ध्यानात धरा. गेल्या ५० वर्षांत या राष्ट्राच्या स्वातंत्र्याशिवाय त्यांनी कशाचा विचार केला नाही. प्रत्येक क्षणाचा तेच एक हिशोब देऊ शकतील. अशा महात्म्याविषयी का असे बोलावे?’ असे म्हणून तो संतापाने थरथरत निघून गेला.
आणि युरोपखंडात महायुध्द सुरु झाले. जर्मनीने पोलंडवर प्रखर प्रहार केला. इंग्लंडनेही युध्द पुकारले आणि हिंदुस्थानही युध्दात ओढले गेले. काँग्रेसने या युध्दासंबंधी एक धीरोदात्त पत्रक प्रसिध्द केले. ते पत्रक वाचून कृष्णनाथ नाचला. प्रत्येकाने हे पत्रक घरात फ्रेम करुन लावावे असे तो म्हणाला.
काँग्रेस का स्वातंत्र्याचा लढा सुरु करणार? तरुणांत चर्चा होऊ लागल्या. काही तेजस्वी तरुण कॉलेज सोडून प्रचारार्थ जायला सिध्द झाले. कृष्णनाथाची एका बुध्दीमान तरुणाशी ओळख झाली होती. त्याचे नाव मधू. त्या दिवशी रात्री मधूचे व त्याचे बोलणे झाले.
मधू, तू इतक्यात कॉलेज सोडून जाऊ नकोस. लढा सुरु झाल्यावर आपण त्यात भाग घेऊ!’
‘लढा येणारच आहे. परंतु आधीपासून प्रचार नको का? खेडयापाडयांतून प्रचार कोण करणार? आपण पुस्तके नि परीक्षा दूर ठेवून बाहेर पडेल पाहिजे. ज्ञानाची उपासन कोठेही करण्याइतके समर्थ आपण झालो आहोत. कृष्णनाथ, तू थांब; परंतु मला जाऊ दे!’
‘तू घरी विचारलेस का?’
‘घरी कसे विचारु? सर्वांना मनात प्रणाम करुन मी जाणार आहे.’
‘आपण खेडीपाडी उठवू असे तुला वाटते?’
‘मी लहानपणी सारे कागद जाळीत असे. आई म्हणायची, ‘आगलाव्या’ आहेस. कृष्णनाथ, दुस-यांची जीवने मी पेटवू शकेन की नाही, ते मला माहित नाही. मी माझे जीवन तरी पेटवले आहे. हे पेटवलेले जीवन घेऊन मी सर्वत्र हिंडेन, फिरेन!’