आपण सारे भाऊ 58
केवढा तो प्रचंड झेंडाचौक आणि तो विठ्ठलभाईंचा प्रचंड पुतळा! दिल्लीच्या असेंब्लीत वीरशिरोमणी सरदार भगतसिंग, बटुकेश्वर दत्त वगैरेंनी बाँब फेकला असता सारे घाबरुन पळाले. परंतु विठ्ठलभाई गंभीरपणे नि शांतपणे अध्यक्षीय खुर्चीत बसून होते. असेंब्ली गाजविणारा खरा झुंजार अध्यक्ष! पगार हाती पडताच महात्माजींकडे रक्कम पाठविणारा त्यागी कर्मवीर! काळी खादी सिमल्यात मिळेना तर सरोजिनीदेवींचे काळे पातळ फाडून त्याचाच काळा झगा वापरुन जाणारे महान् खादीभक्त! असे ते विठ्ठलभाई! सरदार वल्लभभाई नि सरदार विठ्ठलभाई म्हणजे भीमार्जुनांची अद्वितीय जोडी!
कृष्णनाथ मोठा भाग्याचा! त्याला नेतानिसांत काम मिळाले. त्याची चलाखी, त्याची नम्रता, त्याचे प्रसन्न मुख यांची सर्वांवरच छाप पडे आणि पंडित जवाहरलाल नेहरुंनी एकदा त्याना शाबासकी दिली. पंडितजींच्या वरदहस्ताचा स्पर्श होताच कृष्णनाथाच्या शरीरातील अणुरेणू नाचला!
शारदाश्रमांतील स्वयंसेवक अमर अशा स्मृती घेऊन परत आले. कृष्णनाथाने विमलला एक केवढे थोरले पत्र लिहिले. विमलचेही उत्तर आले. त्या उत्तरात पुढील मजकूर होता.
‘तू खादीभक्त झालासच आहेस. आत काँग्रेसभक्तही होणार असे दिसते. परंतु काँग्रेसभक्ताला नुसती खादी वापरुनच भागत नाही, तर त्याला तुरुंगात जावे लागते. प्रसंगी छातीवर लाठीमार वा गोळीबारही घ्यावा लागतो. काँग्रेसभक्ती म्हणजे सतीचे वाण आहे, त्यागाची दीक्षा आहे. हे सारे लक्षात घेऊन या नव्या भक्तीची दीक्षा घे!’
कृष्णनाथने पुढील पत्रात लिहिले :
‘खादीमध्ये काँग्रेसभक्तीच काय, सर्व काही सामावलेले आहे. महात्माजी म्हणतात, खादी वापरुन स्वातंत्र्यासाठी मरण्याची जर स्फूर्ती येत नसेल तर ती खादी काय कामाची? खादी ही स्वातंत्र्याची खूण आहे. दरिद्रिनारायणांच्या सेवेची दीक्षा आहे खादी वापरुन गरिबांना लुटता येणार नाही! विमल, खादीत महान अर्थ आहे!’
कृष्णनाथ मॅट्रिकच्या परीक्षेला जावयाचा होता. शारदाश्रम सोडून तो जाणार होता. ज्या शाळेला त्याने हुतूतू, खोखो वगैरे खेळांतील ढाली मिळवून दिल्या, उंच उडीतला पेला मिळवून दिला, ज्या शाळेत व ज्या छात्रालयात तो लहानाचा मोठा झाला, विचाराने वाढला; जेथे अनेक मोलाचे धडे त्याने घेतले ते सारे सोडून आज तो जाणार होता. सर्व मुलांचा, गडीमाणसांचा, स्वयंपाक्याचा त्याने निरोप घेतला. सर्व गुरुजनांच्या तो पाया पडला आणि शारदाश्रमाच्या चालकांच्या पाया पडताना तो स्फुंदू लागला. चालकांनी त्याला पोटाशी धरले. भावना आवरुन ते म्हणाले.