आपण सारे भाऊ 16
कृष्णनाथ रडत रडत घरात आला. तो आपल्या खोलीत बसला. आई असती तर, बाबा असते तर, असा विचार त्याच्या मनात आला. बाबांनी गाडीसुध्दा दिली असती. आईने कितीतरी फराळाचे दिले असते. परंतु आज कोण आहे? इतक्यात त्याला एक गोष्ट आठवली. आईने त्याला एकदा एक रुपया दिला होता. तो त्याच्या पेटीत होता. त्याने ती आपली लहानशी पेटी उघडली. खरेच तेथे तो रुपया होता. आपण बाजारातून फराळाचे घ्यावे असे त्याच्या मनात आले. तो रुपया त्याचा होता. त्याचाच त्याच्यावर हक्क होता. आईने दिलेला तो रुपया. परंतु आईची ती आठवण होती. तो रुपया का खाऊन दवडायचा? हातात रुपया घेऊन कृष्णनाथ तेथे बसला होता. त्या लहानग्या मुलाच्या मनात कोणते विचार खेळत होते?
इतक्यात वैनी आली. कृष्णनाथाचे डोळे ओले झाले होते.
‘तेथे बसून काय करतोस? आणि तिन्ही सांजा रडायला काय झाले? जा, बाहेर खेळायला, घरकोंबडा मेला. ऊठ!’
कृष्णनाथ उठला. तो त्याच्या हातून रुपया खाली पडला.
‘काय रे वाजले?’
‘माझा रुपया.’
‘रुपया?’
‘हो.’
‘कोणी रे दिला रुपया?’
‘आईने एकदा दिला होता. माझ्या या पेटीत होता ठेवलेला. मला त्याची आठवण झाली.’
‘आईने दिला होता का रे, चोरा! आणि इतके दिवस तो राहिला अं? खरं बोल. त्यांच्या खिशातून घेतलास की नाही! खरे बोललास तर मार नाही बसणार. आणि त्या रुपयाचे काय करणार होतास? बोल?’
‘बाजारांतून फराळाचे आणणार होतो.’
‘त्यांना विचारलेस का? मला विचारलेस का?’
‘परंतु हा रुपया माझाच होता. आईने दिला होता.’