आपण सारे भाऊ 51
बोर्डी गाव अतिसुंदर आहे. समुद्रतीरावर तो वसला आहे. जमीन अती सुपीक आहे. बोर्डी आणि घोलवड दोन्ही जवळ जवळ गावे. घोलवडचे चिकू सा-या मुंबई प्रांतात प्रसिध्द आहेत. नद्या समुद्राला मिळायला आलेल्या आहेत. त्या नद्यांच्या शेकडो वर्षे गाळ वाहत येऊन त्या गाळाने ही जमीन बनली आहे. त्यामुळे ती समृध्द आहे. उद्योगी लोकांनी येथे चिकूच्या प्रचंड वाडया केल्या आहेत. लाखो रुपयांचे चिकू तथून जातात आणि भाजीपालाही येथून मुंबई-अहमदाबादकडे जातो. तोंडल्याचा व्यापार करुन अनेक लोक येथे सुखी झाले. इकडचे लोक मेहनती आहेत. नाना प्रयोग करणारे आहेत. आंब्यांचे शेकडो प्रकार त्यांनी लाविले आहेत.
बोर्डी व घोलवड या दोन्ही गावांमध्ये इंग्रजी शाळा व तिचे शारदाश्रम या नावाने प्रसिध्द असलेले छात्रालय ही वसली आहेत. समारे अपार समुद्र रात्रंदिवस उचंबळत असतो. येथल्या समुद्रकिना-यासारखा समुद्र किनारा क्वचित कोठे असेल, जेव्हा ओहोटी असते, तेव्हा समुद्र मैलच्या मैल आत जातो आणि सारखे सपाट असे ईश्वराचे विशाल अंगण तेथे दिसत असते. कोठे खाचखळगा नाही. वाळूचे ओलसर मैदान! आणि वाळलेल्या भागावर ते वाळूतील किडे, रांगोळी काढीत असतात! किती आकारांची रांगोळी! त्यांत हिंदुस्थानाचा सुध्दा आकार दिसतो! कातगोळयांसारखी ओली वाळूही किडे सर्वत्र पसरतात. पुन्हा भरती आली की ते रांगोळी पुसली जाते. आणि तीरावरच सुरुच्या झाडांची दाट राई! शाळेचे ते एक वैभव होते. कधी कधी शिक्षकांची संमेलन त्या सुरुच्या शतस्तंभी प्रसादांत भरत असत व शिक्षणशास्त्राची चर्चा होत असे. आदर्श पाठ त्या शीतल छायेत देण्यात येत. मोठी मौज होती ती.
आणि आफ्रिकेतील हिंदी व्यापा-यांनी बांधून दिलेले ते समोरचे व्यायाममंदिर आणि व्यायाममंदिराच्या बाहेर मुलांसाठी ठेवलेली ती नानाविध क्रीडासाधने. तिकडे समुद्र नाचत असतो, आणि इकडे मुले झोके घेत असतात! वारा त्यांना साथ देत असतो.
अशा निसर्गरम्य स्थानी शारदाश्रम छात्रालय होते. लांबलांबची मुले त्या छात्रालयात राहात होती. कोणाचे आईबाप आफ्रिकेत, तर कोणाचे ब्रम्हदेशात, कोणाचे लंकेत, तर कोणाचे कराचीत; कोणाचे दिल्लीला, तर कोणाचे नागपूरला. आईबाप विश्वासाने मुले ठेवीत आणि घरच्यासारखी खरोखरच येथे त्यांची काळजी घेण्यात येई.
अशा या ध्येयार्थी संस्थेत कृष्णनाथ आला स्टेशनवर त्याला घेण्यासाठी छात्रालयातून एक शिक्षक आले होते. त्यांनी विचारले,
‘आपणच का कृष्णनाथ?’
‘हो.’
‘इतकेच का सामान?’
‘एवढेच आहे.’
‘थांबा. तो हमाल घेईल ते सामान.’