आपण सारे भाऊ 57
कृष्णनाथ खाली मान घालून बाहेर आला. तो दुस-या एका झोपडीत शिरला. तेथे टोपलीत निसून ठेवलेले कंद होते.
‘हे कसले कंद?’
‘डोंगरातले आहेत. ते कडू आहेत. रात्री आम्ही शिजवून ठेवतो. सकाळी खातो. सकाळी कडूपणा कमी झालेला असतो.’
कृष्णनाथाने थोडासा कंद खाऊन पाहिला. तोंड कडू कडू झाले. ते सारे प्रकार पाहून कृष्णनाथ खिन्न झाला. इतर मुले हसत खेळत होती. परंतु त्याला हसू येईना. त्याच्या डोळयांत पाणी आले.
मुले छात्रालयात परत आली. परंतु कृष्णनाथ काही दिवस खिन्नच होता.
‘तू अलीकडे हसत का नाहीस? तुझा आनंद कोठे गेला?’ अशोकने विचारले.
‘त्या सफरीत नाहीसा झाला. मी त्या वारली दुबळया लोकांची दशा पाहिली. अशोक, आपण येथे किती सुखात राहतो! सकाळी खायला दुपारी जेवायला, मधल्या वेळी खायला, शाळा सुटल्यावर थोडे च्याऊ म्याऊ पक्वान्ने! आणि त्या श्रमणा-या लोकांनी पाल्यावर जगावे, कडू कंद खाऊन रहावे? अरेरे! अशोक, कसा रे मी हसू?’
‘कृष्णनाथ, आपण लहान आहोत.’
‘परंतु, उद्या आपणच मोठे होणार आहोत. परवा फळयावर कोणते वाक्य होते ते आठवते का?’
‘कोणते बरे?’
‘आजचे तरुण हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत.’
‘या वयात नकोत हे विचार. सध्या आपण शिकू, हसू, खेळू, जीवनात आज आनंद भरपूर ठेवू या; म्हणजे उद्या ती शिदोरी पुरेल.’
‘अशोक, परवाच्या प्रवासाने मला नवीन दृष्टी मिळाली, नवी सृष्टी दिसली. खरोखरचा हिंदुस्थान कसा आहे ते पाहिले. महात्माजी खादी वापरा म्हणून सांगतात ते उगीच नाही. यापुढे मी खादीच वापरीन. या अशा गरिबांना दोन घास मिळतील.’
उगीच नाही. यापुढे मी खादीच वापरीन. या अशा गरिबांना दोन घास मिळतील.’
‘खादी महाग असते.’
‘शारदाश्रमांतील मुलांनी तरी खादी महाग असते असे म्हणू नये.’
इतक्यात अभ्यासाची घंटा झाली. जो तो मुलगा अभ्यास करु लागला.
आणि यंदा जवळच हरिपुरा येथे राष्ट्रीय सभेचे वार्षिक अधिवेशन होते. शारदाश्रमातील मुलांना स्वयंसेवक म्हणून येण्याला परवानगी मिळाली होती. येथील मुले शिस्तीत वाढलेली, गुजराथी नि मराठी दोन्ही भाषा समजणारी, सेवेचे धडे घेतलेली, अशी होती. सर्वांना आनंद झाला. चालकांबरोबर स्वयंसेवक हरिपुरा येथे गेले.
तापीच्या तीरावर एक नवीन अमरपुरी निर्माण करण्यात आली होती. राष्ट्रगौरव सुभाषचंद्र अध्यक्ष होते. गुजराथमध्ये तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले; तिन्ही वेळा बंगालचा सत्पुत्रच अध्यक्ष होता. सुरतेला १९०७ मध्ये राशबिहारी घोष, अहमदाबादच्या अधिवेशनाला देशबंधू दास आणि हरिपुरा येथे देशबंधूंचेच पट्टशिष्य सुभाषचंद्र!