आपण सारे भाऊ 96
‘हे का आपले घर?’ रमेश, उमेशनी विचारले.
‘हो तुमचे घर!’ कृष्णनाथ म्हणाला.
साधे सुंदर घर. महात्माजींची तसबीर होती. सुंदर साध्या चटया पसरलेल्या होत्या. मंडळी आत आली.
‘हे इकडे पाणी आहे. प्रातर्विधी उरका. मग घ्या विश्रांती! असे म्हणून कृष्णनाथ बाहेर गेला. त्याने शेतकरी बंधूंस पाहुणे कोण ते सांगितले. ‘आज सारे दुग्धपान करु. फलहार करु. भाऊ भावाला भेटणार आहे. पंधरा वर्षे झाली!’ कृष्णनाथ सद्गदित होत म्हणाला आणि स्वराज्यवाडीतील सारी स्त्री-पुरुष मंडळी जमली. मुलेबाळे आली. मोसंबी, पोपये वगैरे जी फळे होती ती चिरण्यात आली. कृष्णनाथाने रघुनाथ, रमा, त्यांची मुले यांना बोलविले. त्याच्यासमोर ताटात फळे ठेविली. दूध ठेवले.
‘घ्या!’ कृष्णनाथ म्हणाला.
‘आम्हाला कशाला हे दूध, ही फळे? कशाला हा सत्कार? आम्ही पापी आहोत. आम्ही आमच्या भावाला हाकलून लावले. त्या पापाने आम्हीही भिकेला लागलो. इथे खपू, खाऊ. हे नको स्वागत! कृष्ण्नाथ, कोठे आहेस बाळ?’ रघुनाथ अश्रुकंपित आवाजाने हाक मारता झाला.
‘दादा! हा तुझा कृष्णनाथ तुझ्या पाया पडत आहे! वैनी, आशीर्वाद दे!’
‘कोण, कृष्णनाथ? तू? तुझ्या पाया पडू दे. आम्ही पापी!’
‘नाही, दादा! तुमच्या पाया पडण्याचा माझा अधिकार आणि मला आशीर्वाद देण्याचा तुमचा अधिकार! मागचे सारे विसरुन जा! मीच तुमची खुशाली पाहायला आले पाहिजे होते. परंतु मी तुम्हांला विसरलो आहे. मीही जणु रागातच राहिलो. तुमची अशी वाईट दशा तिकडे होती. या मुलांना पोटभर खायला नव्हते! अरेरे! मी तुम्हांला भेटायला आलो असतो तर? सुरगावला येऊन दुरुन तरी तुमची क्षेमवार्ता विचारुन मी गेले पाहिजे होते. परंतु मी बंधुप्रेमाचे कर्तव्य केले नाही. दादा, शेवटी किती झाले तरी आपण माणसेच! रागद्वेष संपूर्णपणे जाणे कठीण. मागील जाऊ दे. वैनी, मी मागचे कधीच विसरुन गेले आहे. दादा! तुमचे घर पुन्हा तुम्हांला मिळवून देऊ. सावकाराचे पैसे देऊ.’
‘कृष्णनाथ, घर गेलेसुध्दा!’
‘लिलाव झाले?’
‘आम्ही होतो तो नव्हता झाला. परंतु झाली असेल. आणि आता तुला सोडून जायचे नाही. आपण दोघेही भाऊ एकत्र राहू!’
‘दादा, आता आपण दोघेही भाऊ नाही राहिलो. हे सारे शेतकरी आपलेच भाऊ. आपण सारे भाऊ भाऊ!’
‘होय, आपण सारे भाऊ, एकत्र राहू!’ जमलेले शेतकरी म्हणाले.
आणि सर्वांना फुले देण्यात आली. सर्वांना आनंद झाला होता. इतक्यात ती पाहा दोन माणसे आली. कोण आहेत ती?