आपण सारे भाऊ 81
‘अरेच्चा! मी म्हटले रात्रीचाच की काय? रात्री ठरवू तिथी कोणती ती.’
‘जर ढग नसतील तर!’
‘परंतु मी सांगून टाकतो की, आज शुक्ल पक्षातील पौर्णिमाच आहे!'
‘कृष्णनाथ, पौर्णिमा काही कृष्ण पक्षात नसते!'
‘त्रिंबक, चल आपण जाऊ; नाही तर पौर्णिमेची आमावास्या व्हावयाची. भलोबा, लवकर द्या हां लिहून!’
‘लवकर देतो. आणि तू मुख्य नायक ना? चांगले कर काम!’ कृष्णनाथ नि त्रिंबक हसत गेले.
आणि ९ ऑगस्टला खरेच सुंदर नाटक झाले. कृष्णनाथाची भूमिका फारच सुंदर वठली. जंगलांतील देखावा तर रोमांचकारी होता. गोळीबार होत आहे. स्वातंत्र्यवीर निसटून जात आहेत. एक जखमी होऊन पडतो. त्याला तहान लागते. पळसाच्या द्रोणांतून त्याला पाणी पाजतात अणि मित्राच्या मांडीवर तेथे रानात तो वीर मरतो! तो देखावा पाहत असता सर्वत्र निस्सीम स्तब्धता होती!
तुरुंगात असे दिवस जात होते. कधी चर्चा, कधी वाचन, कधी व्याख्यानमाला, कधी काव्यगायन, कधी नाटक, कधी कीर्तन, कधी भजन तर कधी झुलू नाच, असे जीवन चालले होते. परंतु या सर्व गोष्टींमुळे आत्मा अधिकच पुष्ट होत होता. उदार भावना वाढत होत्या. ध्येयांना निश्चितता येत होती. तेथे गंमत, मौज, विनोद, आनंद होता. परंतु त्यामुळे देशभक्ती दडपली जात होती. देशभक्तीचा भव्य दीप हृदयाहृदयांत अधिकच तेजाने तेवत होता. कृष्णनाथाचे जीवन तरी तेथे समृध्द होत होते. सर्वांचा तो आवडता होता. प्रथम प्रथम जरा दूर राहात असे. परंतु आता खेळात, विनोदात सर्व गोष्टींत भाग घेई. शारदाश्रमातील कृष्णनाथ या कृष्णमंदिरातील आश्रमात अधिकच शोभून दिसत होता. त्याच्या वाढत्या आनंदाचे मुख्य कारण म्हणजे विमलने त्याच्या ध्येयाला मान्यता पाठविली होती!