आपण सारे भाऊ 41
परंतु त्याच्या कामात थोडी चूक झाली. सारे प्रेक्षक हसले. कृष्णनाथ एकदम ओशाळून पडद्यात गेला. मॅनेजर संतापला. ‘खेळ संपू दे. मग बघतो तुला. याला नेऊन बांधून ठेवा!’ तो म्हणाला.
खेळ संपला. प्रेक्षक गेले आणि मॅनेजर कृष्णनाथाकडे आला. त्याने आज त्याला गुराप्रमाणे झोडपले! बाळ रक्तबंबाळ झाला.
‘मला ठार मारा!’ कृष्णनाथ ओरडला.
‘ठार मारले तर हा आनंद कसा घेता येईल? सोडा रे याला. मलमपट्टी लावा. तिकडे पडू दे!’
कृष्णनाथ तू पळून का जात नाहीस? येथे असा मरत का पडला आहेस? सारखा का पहारा आहे? का तुझी इच्छाशक्तीच मेली? सारी संकल्पशक्ती नष्ट झाली? तू का जड यंत्र बनलास? या सर्वांनी तुझा का ठोकळा बनविला? ही बंधने तोडून का नाही तू निघून जात, पळून जात?
काय असेल ते असो. कृष्णनाथ पळून गेला नाही हे खरे.
परंतु मुक्तीचा दिवस एके दिवशी आला. इंद्रपूरला सर्कस आली होती. तंबू ठोकला जात होता. वन्य पशूंचे पिंजरे बाहेर होते. एका बाजूला हत्ती झुलत होते. त्या बाजूला घोडे आणि ती पाहा माकडे. सारे पशुपक्षी जणू तेथे आहेत.
ती पाहा लोकांची गर्दी! वाघ-सिंह पाहायला शेकडो लोक आले आहेत. मुलांचा उत्साह तर विचारु नका. आणि सिंहाने गर्जना केली. घाबरुन पाहणारे लोक जरा बाजूला झाले. सिंह येरझारा घालीत होता. कोणी त्याला खडा मारला. परंतु मृगराजाचे तिकडे लक्ष नव्हते.
रस्त्यात एक मोटार थांबली.
‘बाबा, तुम्हीही चला ना माझ्याबरोबर पाह्यला. आपण लवकर परत येऊ. चला बाबा.’
‘तू ये पाहून. ती बघ किती मुले आहेत.’
‘नाही; तुम्ही चला.’
शेवटी म्हातारा बापही उठला. मुलीची इच्छा त्याला मोडवेना. आवडती एकुलती एक मुलगी. बापाचा हात धरुन विमल निघाली.
‘मी येथे उभा राहतो. तू ये पाहून. त्या गर्दीत मी नाही येत.’