आपण सारे भाऊ 40
कृष्णनाथाचे हाल कुत्रासुध्दा खाईना. तो मॅनेजर दुष्ट होता आणि या लहान मुलाचे हाल करण्यात त्याला एक प्रकारचा आनंद वाटै. तो पळून जाईल म्हणून त्याच्यावर पहारा असे. काम करताना काही चुकले की तो त्याला बेदम मारी. शरीराच्या निरनिराळया घडया करण्याचे काम त्याला शिकविण्यात येत होते. बिचारा कृष्णनाथ!
‘त्याला चार दिवस खायला देऊ नका काही! दादाकडे फुकट खाऊन नुसता फुगला आहे. बघतो कसे अंग वळत नाही ते! या शंभूचे अंग असेच प्रथम वळत नसे. परंतु पुढे रेशमासारखे मऊ झाले अंग. वाटेल तशी घडी घाला. तापवून लोखंडसुध्दा मऊ होते; द्या मग ठोकून वाटेल तो आकार. काय शंभ्या, खरे की नाही? आठवताहेत की नाही ते दिवस? आज शंभ्याचे काम पाहून लोक टाळया वाजवतात, परंतु पहिल्याने लोखंडाचे चणे खावे लागले आहेत!’
‘मला हे काम येणार नाही. दुसरे शिकवा!’
‘वाघाच्या तोंडात मान देशील? शिकवू? आहे तयारी?’
‘मला भीती वाटते.’
‘त्या वाघालाही खायची भीती वाटते, परंतु सध्या हेच काम शीक. येथे माझी इच्छा प्रमाण. तुझी नाही! हे घर नाही. करशील की नाही नीट काम? का बांधू खांबाला नि चाबूक उडवू?’
‘मला जमत नाही.’
‘जमेल, जमेल.’
‘खरेच नाही जमणार. माझी पाठ वाकतच नाही!’
‘लवकरच वाकेल. ती फार ताठ झाली आहे, नाही? पाठीचा कणा आता लवचिक होईल बघ. जा रे याला घेऊन. ती प्रॅक्टिस द्या. जर सुधारणा असेल तर ठीक, नाही तर खाणे बंद! चल, नीघ! नीट चालत जा!’
ते शिकवणारे त्याला घेऊन गेले. यमदूतांचा सारा कारभार, सर्कस या गावांहून त्या गावाला जात होती. आज पुणे, उद्या नगर, परवा सोलापूर, तेरवा बेळगाव, कधी सुरत तर कधी बडोदे; कधी नागपूर तर, कधी कानपूर, कृष्णनाथाचे सुरगाव मात्र कधी परत आले नाही!
आज प्रथम कृष्णनाथाचे सर्कशीत काम होते. खेळ सुरु झाला होता. एकदा कृष्णनाथ एकटाच प्रेक्षकांसमोर येऊन त्या विवक्षित पध्दतीने प्रणाम करुन गेला. त्याची कोमल व सुंदर मूर्ती पाहून प्रेक्षकांनी टाळया वाजवील्या.