आपण सारे भाऊ 92
स्वराज्यवाडीची नीट आखणी झाली. शेतकरी खपत होते, राबत होते. त्यांच्याबरोबर कृष्णनाथ होता. विमल होती. काम करता करता नवयुगाची गाणी गात होते. सुंदर झोपडया बांधण्यात आल्या. हवा प्रकाश खेळतील अशा या झोपडया होत्या. रस्ते नीट आखण्यात आले. गटारे खोदण्यात आली. या शेतांजवळून माळण नदी गेली होती. इंजिने लावून तिचे पाणी आणण्यात आले. नळाचे निर्मळ पाणी, गाव स्वच्छ होता. संडास स्वच्छ. धावपाण्याचे संडास होते!
स्वराज्यवाडीत एक मोठी फुलबाग होती. मुलांना खेळायला तेथे नाना प्रकारची साधने. कृष्णनाथ बोर्डीच्या आश्रमात सारे शिकलेला होता. बागेच्या मध्यभागी एक कारंजे थुईथुई उडत असे. जणू येथील सर्वांच्या हृदयातील तो आनंद होता!
मुलामुलींची तेथे शाळा होती. मुलांचे सुंदर वाचनालय नि ग्रंथालय होते. एक मुलांची प्रयोगशाळा कृष्णनाथाने तेथे बांधली होती. तेथे एक वस्तुसंग्रहालयही होते. सुंदर चित्रांची एक चित्रशाळाही होती. मुलांना गाणे, चित्रकला, विज्ञानाच्या गमती शिकवायला शिक्षक होते. कृष्णनाथाने तुरुंगात असताना नवीन मित्र जोडले होते. तेही या प्रयोगात सामील झाले. मुलांना शिकवीत, वेळ असेल तेव्हा कामही करीत. उद्योगद्वारा शिक्षण देण्याकडे त्यांचे लक्ष असे. वर्धा शिक्षणपध्दतीच खरी शास्त्रीय असे त्यांना पटले होते.
रात्रीच्या शाळेत मोठी मंडळी येई. येथे चर्चाही होत. नवीन काय करायचे, अडचण काय, यांचा विचार होई. वर्तमानपत्रे वाचण्यात येत. स्वराज्यवाडी म्हणजे उद्योगांचे, प्रेमाचे, ज्ञानाचे माहेरघर होते. देवाचे पाच पंच तेथे काम करीत. कोणते हे पाच पंच? उद्योग, उद्योगांत सुधारणा करणारे विज्ञान, उद्योगाची फळे सर्वांनी चाखावी असे शिकवणारे प्रेम, उद्योग करायला हवा तर आरोग्य हवे असे सांगणारे आरोग्य आणि आरोग्य हवे असेल तर स्वच्छता हवी असे सांगणारी स्वच्छता! हे पाच पंच तेथे होते. नम्रता नि निर्भयता तेथे होती. मोकळेपणा होता. दंभ नव्हता.
वसाहत गजबजली. तेथे भेदाभेद नव्हते. स्पृश्यास्पृश्य नव्हते, हिंदु-मुसलमान नव्हते. आकाशाच्या मंदिराखाली आकाशाच्या गोल घुमटाखाली जो तो आपली प्रार्थना मनात म्हणे, भावना उचंबळल्या की हात जोडी. सर्व सृष्टीबद्दलची प्रेमभावना मनात उसळणे म्हणजे खरा धर्म! हा धर्म म्हणजे अफू नाही! मनुष्यप्राणी वृक्षवनस्पतींतून, जलचरस्थलचरांतून, सर्व पशुपक्ष्यांतून उत्क्रांत होत आला आहे. एखादा क्षण त्याच्या जीवनात असा येतो की, ज्या वेळेस या सर्व चराचराविषयी त्याला प्रेम वाटते. कारण त्यांतून तो आलेला असतो. कोटयावधी पूर्वसंस्कार क्षणभर जागृत होतात. एके काळी मी हिरवे गवत होतो, मी वृक्ष होतो, वेल होतो. मी लहान जीव होतो, पक्षी होतो, पशू होतो, माकड होतो, त्यांतूनच माझे मानव्य फुलले! पानाचाच पूर्ण विकास म्हणजे फूल. या जीवनाचा, प्राणतत्वाचा संपूर्ण विकास म्हणजे मी मानव, असे मनात येऊन, सर्व सृष्टीविषयी प्रेम उचंबळते. चराचराला मिठी मारावी असे वाटते! हा धर्म अफु नाही. हा शास्त्रशुध्द धर्म आहे. वैज्ञानिक धर्म आहे. त्या स्वराज्यवाडीत अशा धर्माचे अंधुक दर्शन होई!
‘इंद्रपूरचा आपला वाडा आहे त्याचे काय करायचे?’ विमलने एके दिवशी विचारले.
‘कशाला तरी देऊन टाकू!’ कृष्णनाथ म्हणाला.