आपण सारे भाऊ 30
‘ये, आपण जरा कॅरमने खेळू.’
‘मला नाही नीट येत.’
‘येईल, हळूहळू येईल.’
‘आज दादा, श्रीखंड आहे. पण आज सण नाही, मग कशाला श्रीखंड?’
‘तुला आवडते म्हणून मुद्दाम केले आहे. आई नसे का मधून मधून करीत?’
‘दादा, आई देवाजवळ दिवा लावीत असे. रात्री असे, दिवसा असे, वैनी का नाही लावीत?’
‘तेल महाग झाले आहे. आणि आता आपल्या गावत लवकरच वीज येणार आहे. मग देवाजवळ विजेचा दिवा लावू.’
‘कॅरम खेळता वाटते? आज मोटारीतून बसून जायचे आहे कृष्णनाथाला.’
‘वैनी, तू येणार ना?’
‘मला कोण नेणार? ते येतील तुझ्याबरोबर. दोघे भाऊ जा.’
‘तूसुध्दा आमचीच. तू दादाची आणि मी तुमचा; नाही दादा?’
‘वैनी नको बरोबर; आपणच जाऊ. जेवायचे झाले असेल तर वाढ.’
‘तुमचा भावाभावांचा खेळ आटपू दे.’
‘वैनी, तू खेळ माझ्याऐवजी, म्हणजे लवकर आटपेल.’
‘आम्ही खेळू लागलो तर तू उधळून टाकशील. त्या दिवशी आमचा खेळ उडवून दिला होतास.’
‘आणि दादाने मारले.’