आपण सारे भाऊ 65
‘आता नको त्याची चर्चा. मी आता जरा पडतो.
कृष्णनाथ उठून गेला. पुण्याला जाण्याचे दिवस आले.
‘विमल, तू बाबांना जप.’
‘कृष्णनाथ, तुझीच त्यांना चिंता वाटते. तिकडे वेडेवाकडे काही करु नकोस!’
‘वेडेवाकडे म्हणजे काय?’
‘तुला सारे समजते. बाबांच्या भावना ओळख नि वाग!’
कृष्णनाथ पुण्यात आला. तो आपल्या अभ्यासात पुन्हा रमला. १९४० साल गेले. काँग्रेसचा प्रतिकात्मक असा निवडक लोकांचा सत्याग्रह सुरु झाला होता. कृष्णनाथचा मित्र मधू कधीच तुरुंगात जाऊन पडला होता. उगीच मधू आधी गेला. मोठा लढा नाही, काही नाही, असे तो एखादे वेळेस मनात म्हणे. इंटरच्या परीक्षेत त्याला पहिला वर्ग मिळाला नाही.
‘तू पहिल्या वर्गात येशील असे मी म्हणत होतो’, माधवराव म्हणाले.
‘बाबा, अभ्यासात तितके लक्ष लागत नसे. माझे काही मित्र आज तुरुंगात आहेत.’
‘तू आपल्या मनाला आवरलेस ही प्रभूची कृपा!’
‘बाबा, स्वराज्यासाठी का तुरुंगात जाऊ नये?’
‘परंतु तुरुंगात जाऊन स्वराज्य मिळत नाही. स्वातंत्र्य मिळत नाही.’
‘बाबा, स्वातंत्र्य म्हणजे तरी काय? या जगात खरे स्वातंत्र्य आहे का कोठे? या विश्वातील शक्तीची आपण खेळणी आहोत. जीवन म्हणजे बुडबुडा आहे. मनुष्य आज आहे, उद्या नाही. कशाची शाश्वती आहे? वादळे येतात. साथी येतात, दुष्काळ येतात, ज्वालामुखींचे स्फोट होतात, भूकंपाचे धक्के बसतात! आपण या विश्वात परतंत्रच आहोत. स्वातंत्र्य एकच आहे.’
‘ते कोणते बाळ?’