आपण सारे भाऊ 73
त्या मोठया घरात आता विमल नि कृष्णनाथ दोघेच होती. कृष्णनाथ फार बोलत नसे. तो विचारांत मग्न असे. देशातील रोमांचकारी कथा त्यांच्या कानी येत होत्या. वर्तमानपत्रांतून फारच थोडे येत असे.
‘कृष्णनाथ तू बोलत का नाहीस? मला आता तुझाच एक आधार आहे. आई मला लहानपणीच सोडून गेली. बाबांनी प्रेमाने मला वाढविले. तेही गेले! वात्सल्यमयी आत्याबाईही गेली. तू मला आहेस हे मरताना त्यांना समाधान होते. परंतु तू दोन शब्दही बोलत नाहीस! तुझ्या गळयात मी घोरपड पडले असे का तुला वाटते?’
‘विमल, काय हे बोलतेस? मी का कृतघ्न आहे?’
‘कृष्णनाथ, कृतज्ञता म्हणूनच तू माझा स्वीकार केलास का? मी तुझी व्हावे असे कधीच तुझ्या मनात आले नव्हते? खरे सांग!’
‘माझ्या मनात प्रेम, कृतज्ञता इत्यादी अनेक भावनांचे मिश्रण आहे. विमल, खोदूनखोदून मला विचारु नकोस. तू माझी आहेस नि मी तुझा आहे. आपली जीवने आता एकत्र मिसळली आहेत. मनात भलतेसलते विचार आणू नकोस!’
‘तू का रे नीट वागत नाहीस?’
‘माझ्या मनात देशाचे विचार चालले आहेत. परंतु बाबांनी तर बंधन घालून ठेवले आहे. त्या थोर पुण्यात्म्याची शेवटची इच्छा का मोडू?’
‘कृष्णनाथ, माझ्या सुखासाठीच बाबांनी ते बंधन घातले आहे. परंतु त्या बंधनापासून मी तुला मुक्त करते. स्वातंत्र्याच्या संग्रामात भाग घे. जा!’
‘मला पूर्ण विचार करु दे.’
मधून मधून त्यांची अशी बोलणी होत. एके दिवशी रात्री कृष्ण्नाथ वाचीत बसला होता. किती वेळ झाला तरी तो झोपायला गेला नाही.आज झोपायचे नाही का? विमलने विचारले.
‘मी वाचीत आहे.’
‘हरिजनचे अंक पूर्वी का वाचले नव्हतेस? कशाला या फायली काढल्या आहेस?’
‘हरिजनचे अंक किती वाचले म्हणून का तृप्ती होणार आहे?’
‘आणि हे रे काय?’