आपण सारे भाऊ 43
माधवराव मोटारीत येऊन बसले. आणि मोटारवाला कोठे आहे? तोही तिकडेच वाघ-सिंह पाहात आहे. माधवरावांनी मोटारीचे शिंग वाजवले. तो धावत आला आणि विमलही आली.
‘तुमची सारी घाई!’ ती मोटारीजवळ येऊन म्हणाली.
‘अकरा वाजून गेले विमल!’
‘आज रविवार तर आहे.’
‘या बाळाला भूक लागली असेल. उपाशी आहे तो.’
‘अय्या? हा कोण बाबा?’
‘देवाने पाठवेला बाळ!’
‘तो आपल्याकडे राहणार, बाबा?’
‘हो.’
‘येथे वर बस ना रे, बाळ. खाली का? बाबांच्या जवळ बस. बाबांच्या एका बाजूला मी आणि दुस-या बाजूला तू मध्ये बाबा.’
‘गणपतीबाप्पा ना?’
‘इश्श्य, गणपतीबाप्पा कशाला? तुम्ही का गणपतीबाप्पा? गणपतीबाप्पाचे पोट मोठे हवे!’
‘विमल, आता सर्कशीला नको ना जायला? पाहून झाली ना?’
‘खेळ कुठे पाहिलाय? तुमचे आपले काही तरीच. बाळ, तू पण येशील का रे सर्कस बघायला?’
‘त्याला बरे नाही विमल.’
‘त्याला का ताप आला आहे? खरेच, बाबा, त्याचा हात कढत लागतो आहे. तुम्ही बघा. आणि डोळे बघा कसे झाले आहेत ते. बाबा, कोणाचा हा बाळ?’
‘देवाचा.’
‘सांगा ना!’