आपण सारे भाऊ 44
‘मलाही माहीत नाही. हळूहळू त्याला विचारु, आजच नको. तूही त्याला सतावू नकोस प्रश्न विचारुन. समजले ना?’
‘बाळ, तुझे नाव काय?’
‘कृष्णनाथ.’
‘अय्या, कृष्णनाथ? मी नव्हते ऐकले असे नाव. नुसते कृष्णाअसे असते. नाही बाबा?’
अग, नाथ शब्द देवाच्या नावापुढे लावण्याची पध्दत आहे. रामनाथ, हरनाथ, शिवनाथ, पंढरीनाथ, एकनाथ तसा हा कृष्णनाथ, समजलीस?’
‘आपण याला कृष्णनाथ म्हणूनच हाक मारायची का?’
‘कृष्णनाथ जरा लांब वाटते; नाही?’
‘परंतु माझी आई मला कृष्णनाथ म्हणूनच हाक मारी.’
‘बरे, आम्हीही कृष्णनाथच हाक मारु.’
मोटार घरी आली. माधवराव उतरले. विमल धावतच घरात गेली.
‘आत्याबाई, आपल्याकडे एक नवीन बाळ आला आहे.’
‘केवढा आहे?’
‘मोठा आहे. माझ्याहून मोठा दिसतो.’
‘तरी का बाळ?’
‘बाबा त्याला बाळ म्हणाले. त्याचे नाव कृष्णनाथ आहे.’
‘सुरेख आहे नाव. माझ्या वन्संच्या मुलाचे होते हे नाव.’