आपण सारे भाऊ 91
‘का रे कृष्णनाथ, लहानपणापासून जगाने तुला छळले या जगाचा सूड घ्यावा असे नाही तुला वाटते?’
‘ज्या जगाने माधवरावांचे प्रेम दिले, विमलचे प्रेम दिले, त्या जगावर मी प्रेम नको करु? चल, तुझे हार गुंफू. प्रेमाचे हार, फुलांचे हार!’
विमल नि कृष्णनाथ दोघे माळा करीत बसली.
‘विमल, शेतावर तू कोणते काम करशील?’
‘मला जे करता येईल ते. पाणी लावीन, खणीन, शेतक-यांच्या बायकांना रात्री शिकवीन. आपल्याला होईल ते करावे. कृष्णनाथ, कामापेक्षा वृत्तीचा प्रश्न आहे.’
‘हो, खरे आहे तुझे म्हणणे. आपण येत्या गांधीजयंतीस जायचे शेतावर राहायला आणि पुढे आपण शेतक-यांना बोलावू. सर्वांना सारखी, साधी परंतु सुंदर अशी घरे बांधू. मला किती आनंद होत आहे!’
‘आपल्या या नव्या वाडीला नाव काय द्यायचे?’
स्वराज्यवाडी किंवा काँग्रेसवाडी! तिरंगी झेंडा वाडीच्या चौकात फडफडत राहील. काँग्रेस म्हणजे काय ते सर्वांना समजेल. काँग्रेसचे स्वराज्य म्हणजे श्रमणा-यांचे स्वराज्य! त्या स्वराज्यात पिळवणूक नाही! सर्वांच्या विकासाला संधी. सर्वांनी आवश्यक ती विश्रांती. जीवनाच्या आवश्यक गरजा भागून अधिक थोर असे कलांचे, ज्ञानाचे आनंद मिळविण्यासाठी होणारी सर्वांची सात्त्वि धडपड! काँग्रेसचे स्वराज्य म्हणजे हे! संस्कृतिसंवर्धनांत सारे भाग घेत आहेत! किती थोर ध्येय! किती सुंदर दृश्य!’
‘चल, या माळा घाल त्या तसबिरींना!’
‘आधी तुझ्या केसांत घालू दे ही फुले!’
‘कृष्णनाथ! आधी देवाची पूजा, महात्म्यांची, मग आपली!’
त्या देशभक्तांच्या तसबिरींना हार घालण्यात आले. दोघांनी भक्तीभावाने प्रणाम केले. विमलच्या मायबापांच्या फोटोंसही हार घातले गेले. त्यांनाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक प्रणाम केला.
थोडे दिवस गेले. कृष्णनाथ नि विमल शेतावर राहायला गेली. प्रथम त्यांनी आपली झोपडी बांधली. एके दिवशी त्यांनी कुळांना बोलावले. त्यांना त्यांनी सारे समजावून दिले.
‘असे कसे दादा होईल? ही तुमची जमीन!’ ती कुळे म्हणाली.
‘श्रमणा-यांची ही जमीन! आपण सारे येथे राहू. येथे खपू. तुम्ही येथे राहायला या. घरे बांधू. खरे स्वराज्य करु. ही आपली स्वराज्यवाडी! काँग्रसवाडी!’ कृष्णनाथ म्हणाला.