आपण सारे भाऊ 80
‘दु:ख एकच की; या चार भिंतीच्या आत आहोत आणि सर्व प्रियजनांपासून, आप्तेष्टांपासून आपण दूर आहोत!’
‘परंतु येथे नवीन नाती जोडली जातात. नवीन मैत्री होतात. त्रिंबक, तुला माझा मधु माहीत नाही. तो तिकडे दुस-या एका जेलमध्ये आहे. सुटल्यावर तुझी नि त्याची मैत्री करुन देईन!’
‘अरे, सुटल्यावर कोठे कोठे जाईन याचा काय नेम? मलाच सुटल्यावर कोठे तरी नोकरी करावी लागणार, आहे. काय रे कृष्णनाथ, मग ९ ऑगस्टला रात्री करायचे का नाटक?’
‘परंतु छोटेसे नाटकच नाही.’
‘तू लिही एखादे.’
‘मी लेखक नाही. मी नाटकात काम करीन.’
‘आपण त्या भलोबांना सांगू या की; द्या एखादे लिहून.’
‘त्यात स्त्रीपार्ट नको. येथे करायची पंचाईत.’
‘हो तो एक मुद्दा आहेच. ९ ऑगस्टला चळवळीवर म्हणावे द्या लिहून. झक्क होईल.’ ‘कृष्णनाथ, तू हो मुख्य नायक. तू शोभून दिसशील!’
‘ते मग ठरवू. भांडणे लागतात मुख्य नायक होण्यासाठी. सर्वांचेच म्हणणे पडेल तर मी होईन.'
‘चल त्या भलोबांकडे!’
‘स्वारी लहरीत असली तर देतील पटकन् लिहून!’
‘ते दोघे मित्र भलोबांकडे गेले आणि आश्चर्य की, भलोबांनी एकदम कबूल केले.'
‘भलोबा, आज पौर्णिमा दिसते!’
‘कोणाला माहीत तिथी न बिथी. बाहेर तर अंधार आहे.’
‘अजून दिवस दिसत आहे. भलोबा हा अंधार पावसाचा!’