आपण सारे भाऊ 38
‘कसा हसतोय लबाड! मी घेत नाही. तू जा गाडीतून.’
‘कृष्णनाथसारखा थोडा दिसतो का ग?’
‘माझ्या ध्यानीमनी कृष्णनाथ असे; त्याचा असेल परिणाम.’
‘कंसाला सारखा कृष्ण आठवे.’
‘मी कंस ना?’
‘तू कंस कशी होशील?’
‘मग का पूतनामावशी? म्हणा- वाटेल ते म्हणा. जे केले त्याचा पश्चाताप मला नाही. माझ्या बाळासाठी मी केले आहे.’
रमाला पुन्हा दिवस गेले होते. अरुण बोलू लागला होता. परंतु अकस्मात अरुणला ताप आला. सारी सचिंत झाली. तो ताप साधा पडश्याखोकल्याचा नव्हता. तो दोषी ताप होता. आईच्या मांडीवर अरुण मलूल होऊन पडला होता. रमाच्या डोळयांतून पाणी येत होते.
‘रमा, आपली पापे का फळत आहेत?’
‘खबरदार अशुभ बोलाल तर! पुन्हा पापबीप म्हणू नका. तुम्हांला पाप वाटत असेल तर जा त्या पोराला शोधा. भावाला मिठया मारा! कसले आहे पाप? आणि असलेच पाप, तर मेल्यावर त्या पापाची फळे मी आनंदाने भोगीन. समजले? मी दुबळी नाही. सारी पापे पचवून टाकायला मी तयार आहे. हा बाळ जर पापाने आजारी पडला असेल तर नवीन बाळ या पापिणीच्या पोटी कशाला येता? तुम्ही येथून जा!’
‘शांत रहा!’
‘तुम्ही वाटेल ते बोलू लागलात तरी शांत कसे राहायचे?’
अरुणने ‘आई-’ हाक मारली.
‘काय राजा?’