आपण सारे भाऊ 84
‘अग, आता सारे फटफटीतूनच दळून आणतात. रमा, तुला एकटीला जाते ओढवते?’
‘सिंधू जरा हात लावते.’
‘ती ग कशी हात लावणार?’
‘तेवढा मला पुरतो. नाही तर का तुम्ही लावणार आहात हात?’
‘काय झाले लावला म्हणून? चल, मी येतो. कष्ट पडतील ते दोघांना पडू दे. रमा, तुला ही दुर्दशा माझ्यामुळे आली!’
‘माझ्यामुळे तुम्हांला आली. माझी पहिली मुले जगली असती तर तुम्ही जपून वागला असता. हे सारे माझे पाप!’
‘रमा, मी लढाईवर जाऊ? तुमची ददाद तरी मिटेल. मुलांचे हाल होणार नाहीत!’
‘कुठे जाऊ नका. कुठे जायचे झाले तर आपण बरोबर जाऊ !’
‘रमा, येथे घरात खायला नाही. आणि हे घरही उद्या जाणार!’
‘घर जाणार?’
‘हो, लिलाव होणार! आपण चार बाळे घेऊन कोठे जायचे?’
‘मुंबईस दुसरीकडे कोठे नाही का मिळणार नोकरी?’
‘अग, मुंबईस नोकरी मिळाली तरी राहायला जागा मिळणार नाही. हिंदुस्थानात आज एकच धंदा आहे. जेथे राहायलाही जागा आहे, तो धंदा म्हणजे रिक्रूट होण्याचा!’
‘आपल्या देशात स्वातंत्र्याचा लढा चालला आहे नि तुम्ही का रिक्रूट होणार? आपल्या सुरगावची किती तरी माणसे तुरुंगात आहेत!’
‘तू येतेस तुरुंगात?’