आपण सारे भाऊ 89
‘काय ग विमल, अशी उभी काय राहिलीस?’
‘तुम्ही करा आपले काम!’
‘मी तुम्ही केव्हापासून झालो?’
‘जेलमध्ये जाऊन मनुष्य मोठा होऊन येतो.’
‘तू सुध्दा मोठी झालीस. तुलाही तुम्ही असे म्हणू?’
‘तू बरे दिसत नाही. माझ्या तोंडी तू येवो, तुम्ही येवो, ते गोड करुन घे. त्याच्यावर तर्कटे रचीत बसू नको!’
‘तू विचार काय करीत होतीस?’
‘या गुलाबांकडे पाहात होते.’
‘तुला गुलाब व्हावे असे वाटले ना? परंतु काटयावरचे ते वैभव आहे, सुळावरची पोळी आहे!’
‘गुलाबाला एक काटे आहेत. त्या शेवंतीला काय आहे? कृष्णनाथ, या लहान फुलझाडात तसेच अन्य झाडामाडात किती प्राण असतो, नाही? गुलाबाची फांदी तोडायची, लावायची. ती आपली जगते. शेवग्याच्या झाडाची लहानशी फांदी तोडून लावली तरी जगते. आपला पाय तोडून लावला तर जगेल का?’
‘मी तुरुंगात कानडी शिकत होतो. एका क्रमिक पुस्तकात एक गमतीची कविता आहे. एक होता लंगडा. त्याला एक पाय लाकडाचा बसवलेला होता. तो भिक्षा मागत जात होता. त्याला लागली तहान. एका घराजवळ तो थांबला. घरांतून एक लहान मुलगी आली. ती त्याला पाणी पाजू लागली. तो काही पाणी त्याच्या लाकडी पायावर पडले. आणि काय आश्चर्य! त्याला पाने फुटू लागली आणि पुढे फुले आली आणि फळे आली! ती फळे तो लंगडा खाई, मजेची गोष्ट!’
‘झाड मोठे झाल्यावर तो लंगडा हिंडे कसा! फळांनी ते झाड ओथंबले की त्याचा बोजा तो कसा सहन करी? त्याला तो पाय उचले तरी काय?’
‘विमल, अग, ही गोष्ट आहे!’