आपण सारे भाऊ 68
रमा उठून गेली. तिच्या डोळयांतून आज पाणी आले. भीषण भवितव्य तिला डोळयांसमोर दिसू लागले. रघुनाथचा शर्यतीचा नाद सुटेना. तो कर्जबाजारी झाला. शेतीवाडी जाऊ लागली. घरातील दागदागिने जाऊ लागले आणि हे सारे विसरायला रघुनाथ दारु पिऊ लागला. तो केव्हा तरी घरी येई. रमा वाट पाहात असे. कधी तो तिला मारहाण करी. अरेरे!
एके दिवशी एका व्यापा-याकडे तो बसला होता. पूर्वीची प्रतिष्ठा आठवून व्यापा-याने त्याला लोडाशी जागा दिली. परंतु सर्वांची नजर चुकवून त्याने तेथील नोटांचे पुडके खिशांत घातले आणि घरी गेला. व्यापा-याला पुडके सापडेना. त्याने पोलिसांत वर्दी दिली.
‘आता होते हो पुडके!’ व्यापारी म्हणाला.
‘कोण कोण आले होते?’ फौजदारांनी विचारले.
‘रघुनाथ आताच येथून गेले.’
‘त्या लफंग्याने नेले असेल!’
पोलिसपार्टी एकदम रघुनाथच्या घरी आली. रघुनाथ रमासमोर नोटा मोजीत होता.
‘बघ, रेसमध्ये बक्षीस मिळाले. थांब थोडे दिवस. लाखो रुपये मी मिळवीन. मग पुन्हा हसू-खेळू लागशील की नाही? बोल की; वाचा बसली वाटते?’
इतक्यात पोलीस अधिकारी वर आले.
‘कोठल्या या नोटा?’ त्यांनी दरडावून विचारले.
‘रेसिसमध्ये बक्षीस मिळाले त्याच्या!’ रघुनाथ म्हणाला.
‘चाबकाने फोडीन! खरे बोल! त्या व्यापा-याच्या दुकानातून आणल्यास की नाही! घाला रे याला हातकडया! दारुबाज भामटा!’
‘साहेब, या नोटा सा-या घेऊन जा. त्यांना सोडा. त्यांचे हाल नका करु!’ रमा डोळयांत पाणी आणून म्हणाली.
‘तसे करता येणार नाही! जामिनावर सोडवून घ्या.
‘येथे कोण राहणार जामीन?’
‘माहेरी तार करा!’