आपण सारे भाऊ 29
‘त्याला श्रीखंड आवडत असे.’
‘ते मागवून घेईन. तुम्ही आता झोपा.’
दोघे पडली होती. परंतु त्यांना झोप येत नव्हती. त्यांचे मन का त्यांना खात होते? परंतु ही बघा रमा घोरु लागली. रघुनाथ मात्र तळमळत आहे. तो उठला आणि कृष्णनाथच्या खोलीत गेला. बाहेर चंद्र उगवला होता. चांदणे पडले होते. कृष्णनाथच्या तोंडावर चंद्रकिरण नाचत होते. किती मधुर व शांत दिसत होते ते मुखकमल! आजही कृष्णनाथ का स्वप्न पाहात आहे? तो पाहा हंसला. आणि गोड असे मंद हास्य!
‘आई, दादा चांगला आहे. वैनी चांगली आहे. खरेच. माझी नवीन टोपी छान आहे. उद्या मोटारीतून जाणार आहे. दादा, मी तुझा ना?’
रघुनाथ ते विश्वासाचे शब्द ऐकत होता. विश्वास ठेवणा-या निष्पाप बाळाचा तो उद्या विश्वासघात करणार होता! त्याने कृष्णनाथाच्या अंगावर पांघरुण घातले. त्याने त्याचा एक मुका घेतला.
‘आजच्या दिवस बाळ येथे नीज. उद्यापासून तू कोठे असशील? प्रभु तुझा सांभाळ करो!’
रमा जागी होऊन बघते तो रघुनाथ नाही. ती उठली. कृष्णनाथाच्या खोलीत आली. पतीचा हात धरुन तिने ओढले.
‘आई, वैनी चांगली आहे, दादा चांगला आहे.’
स्वप्नात कृष्णनाथ म्हणाला. क्षणभर रमा तेथे थबकली आणि दुस-या क्षणी ती रघुनाथला ओढून घेऊन आली. एक शब्दही कोणी उच्चारला नाही.
उजाडले. आज घरात आनंद होता. मोठी मेजवानी होती. कृष्णनाथाने नवीन कपडे घातले होते.
‘आज मी मोटारीतून बसून जाणार आहे.’ शेजारच्या मुलास तो सांगत होता.
‘कोण रे नेणार तुला मोटारीतून?’
‘दादा देईल थोबाडीत आणि वैनी चाबूक मारील.’
‘अरे हल्ली त्याचे लाड करतात. हे बघ नवीन कपडे. आहे बुवा, चैन आहे कृष्णनाथाची!’
अशी बोलणी मुलामुलांची चालली होती तो तिकडे दादाने हाक मारली.
‘काय दादा?’