आपण सारे भाऊ 55
कृष्णनाथाने माधवरावांस पत्र लिहिले होते. चालक ते पत्र वाचून खूष झाले.
कृष्णनाथ आता रमला. आनंदात दिवस जाऊ लागले. आणि पावसाळयाची सुटी आली. बरीचशी मुले घरी गेली. परंतु कृष्णनाथ तेथेच राहिला. त्याला अभ्यास भरुन काढायचा होता.
एके दिवशी तो समुद्रात डुंबायला गेला. पावसाचे दिवस. वारा घो घो करीत होता आणि अमावस्येची प्रचंड भरती होती. बरोबर शिक्षक होते. कृष्णनाथला लाट येताच ते उंच करीत. एकदोनदा लाटांखाली तो दडपला गेला. घाबरला. खारट पाणी नाकातोंडात गेले. परंतु पुन्हा तो लाटांशी धिंगामस्ती करु लागला. शेवटी शिटी झाली. सारी मुले बाहेर आली. शारदाश्रमातील विहिरी तुडुंब भरल्या होत्या. नव्या विहिरीचे पाणी तर किती निर्मळ निळे निळे होते. कृष्णनाथ विहिरीत पोहायला शिकू लागला. तो निर्भयपणे वरुन उडी मारी आणि एकदा तरता येऊ लागल्यावर तो नाना प्रकारची कला प्रकट करु लागला. सर्कशीत नाना प्रकारच्या उडया तो शिकला होता. ते प्रकार तो दाखवू लागला. मुलांचा तो आवडता झाला.
एके दिवशी त्याच्या खोलीतील दोन मुलांनी व दुस-या दोन मुलांनी पिकलेले पोपये न विचारता काढले. कृष्णनाथाला ते पसंत नव्हते.
‘कृष्णनाथ, ये खायला!’ मित्रांनी हाक मारली.
‘मला नको. तुम्ही न विचारता ते काढले आहेत.’
‘मोठा शिष्टच आहेस! झाडावर फुकटच गेले असते. नाही तर दुस-या कोणी काढून नेले असते!’
‘परंतु आपण विचारले असते तर आपणाला का परवानगी मिळाली नसती?’
‘तू असला डुढ्ढचार्य असशील हे नव्हते आम्हांला माहीत? आपणच खाऊ या रे!’
त्या मुलांनी भराभर पोपया खाऊन साली तेथेच खिडकीबाहेर टाकून दिल्या आणि ती मुले निघून गेली. कृष्णनाथ एकटाच खोलीत होता. तो उठला व त्या साली गोळा करु लागला. तो चालक तिकडून आले.
‘काय रे करतो आहेस?’
‘या साली गोळा करीत आहेस.’
‘पत्ता लागू नये म्हणून ना?’
‘मी नाही खाल्ल्या पोपया. परंतु येथे घाण नसावी म्हणून या साली मी गोळा करीत आहे.’
‘कोणी खाल्ले पोपये?’