आपण सारे भाऊ 47
इंद्रपूरला सातवी इयत्तेपर्यंतची शाळा होती. कृष्णनाथाचे वय वाढले होते. तो आता बारा-तेरा वर्षांचा होता. माधवरावांनी त्याला घरी शिकवणी ठेवली. इंग्रजी तिसरीच्या परीक्षेस त्याला एकदम बसवणार होते. कृष्णनाथ बुध्दिमान होता. आपत्तीच्या शाळेतून तो गेला होता. तो मनापासून अभ्यास करी. क्षणही फुकट दवडीत नसे. संध्याकाळी तो व विमल बॅडमिंटन खेळत असत. कृष्णनाथ चपळ झाला होता. सर्कशीतील काही गुण त्याच्या अंगी आले होते. विमल नेहमी हरायची. कृष्णनाथ विजयी व्हायचा.
इंग्रजी तिसरीच्या परीक्षेत तो पहिला आला. माधवरावांनी पेढे वाटले.
‘विमल, बघ तो पहिला आला.’
‘खेळातसुध्दा तोच पहिलर. मला नेहमी जिंकतो.’
‘तुला त्याचे काही वाटत नाही ना?’
‘काय वाटायचे? आज मी वाटते नापास झाले?’
‘मास्तरांच्या कृपेनेच वर गेलीस.’
‘आमचे पेपरच कडक तपासण्यात आले. इंग्रजीचे परीक्षक मार्क देण्यात मोठे कंजूष आहेत. त्यांनी पाच मार्क दिले तर पन्नास समजावे, बाबा!’
‘आणि कोणाला पन्नास असतील तर त्याचे पाचशे ना? शंभरातले पाचशे मार्क. तुम्हा मुलांना अभ्यास करायला नको. मास्तरांना नावे मात्र ठेवायला येतात.’
‘कृष्णनाथ, चल आपण खेळू.’
दोघे खेळायला गेली. माधवराव त्यांचा खेळ वरुन बघत होते. त्यांच्या डोळयांत कौतुक होते. मुखावर कोमल प्रसन्नता फुलली होती. त्यांच्या मनात कोणते भाव फुलले होते, कोणते विचार नाचत होते, चमकत होते?
रात्रीची जेवणे झाली. सारीजणे गच्चीत बसली होती. विमलने फोनो लावला होता. आत्याबाई शेंगा निशीत होत्या. कृष्णनाथ त्यांना मदत करीत होता.
‘विमल, तू नुसत्या प्लेटी लाव. तो कृष्णनाथ बघ काय करतो आहे!’