आपण सारे भाऊ 17
‘आईने सारी इस्टेट दिली आहे. विचारायला नको का, की काय रुपयातून घेऊ का फराळाचे? तुला शिंगे फुटायला लागली. आणि हा रुपया आईने दिला हे कशावरुन? आण इकडे तो रुपया.’
‘तो माझा आहे; मी देणार नाही!’
‘इकडे आण सांगते.’
‘तो माझा आहे.’
‘ऐकतोस का नाही?’
‘मी देणार नाही रुपया!’
‘तुला चौदावे रत्नच हवे. तू माजला आहेस. लाडोबा. थांब, ती काठी आणते. ब-या बोलाने रुपया दे!’
‘जीव गेला तरी देणार नाही!’
रमा गेली व वेताची छडी घेऊन आली. कृष्णनाथासाठी तिने कधी खाऊ घेतला नाही, खेळणे घेतले नाही, परंतु गडयाकडून ही छडी मात्र तिने विकत आणवली होती.
‘दे तो रुपया. देतोस की नाही? आण इकडे.’ असे म्हणून रमा त्याला छडया मारु लागली. कृष्णनाथ केविलवाणा रडत होता.
‘दे रुपया.’
‘मेलो तरी देणार नाही!’
‘मर मेल्या; कसा मरतोस ते बघते.’
इतक्यात रघुनाथ आला.
‘काय आहे हा प्रकार? तूसुध्दा लाज सोडलीस वाटते?’