आपण सारे भाऊ 72
‘कृष्णनाथ, ऐक, या म्हाता-याची इच्छा ऐक. विमलचे व तुझे लग्न व्हावे असे किती तरी दिवसांपासून मी मनात इच्छीत आहे. मी आता वाचणार नाही. या एका गोष्टीसाठी माझे प्राण राहिले आहेत! तुमचा विवाह नोंदणीपध्दतीनेच झालेला बरा. तू आजच आला आहेस. उद्या आपण अर्ज देऊ. आणि ही मंगल घटना लवकरच अमंलात आणू. तू नाही म्हणू नकोस. आणि विमलला टाकून तू कोठे जाणार? तुझ्या हवाली तिला करीत आहे. तू तिला सांभाळ. ती मनाची हळवी आहे. कोवळी आहे. तिला सुखी कर! कृष्णनाथ, तू घरी राहून वाटेल ते कर. तू खादी घेऊ लागलास, मी काही म्हटले? तू विमलला खादीने नटव. गरिबांना मदत दे. हे सारे कर. परंतु प्रत्यक्ष लढयात जाऊ नकोस! या म्हाता-याची शपथ आहे.’
कृष्णनाथ काय बोलणार? माधवरावांच त्याच्यावर अपार उपकार होते. त्यांनी त्याच्यावर पुत्रवतृ प्रेम केले होते. परंतु हे सारे पाश दूर नकोत का ठेवायला? सारेच जर मी आणि माझी करीत बसतील तर देशासाठी कोणी मरायचे? स्वातंत्र्यार्थ मरायला निघा, असे का कायद्याने शिकवायचे?
कृष्णनाथ मुकेपणाने उठून गेला.
काही दिवस गेले. एके दिवशी विमल व कृष्णनाथ यांचा विवाह झाला. काही मित्रांना पानसुपारी व अल्पोपाहार देण्यात आला. देशात स्वातंत्र्यार्थ बलिदान होत असता मेजवान्या कोणाला रुचणार?
‘विमल, बाबा आज अगदी थकल्यासारखे दिसतात.’
‘आजच्या दिवसासाठीच ते प्राण धरुन होते. आता केव्हा काय होईल याचा नेम नाही. कृष्णनाथ, तू कुठे जाऊ नकोस- बाबा असेपर्यंत तरी. पुढचे पुढे पाहू!’
आणि खरेच अखेरचा क्षण आला. विमल-कृष्णनाथ जवळ जवळ होती.
‘माझ्या विमलला सांभाळा! सुखी व्हा. घरी राहून वाटेल ते कर. प्रभू तुम्हास सुखी ठेवो!’ असे ते म्हणाले.
विमल रडू लागली. नको रडू, असे खुणेने त्यांनी सांगितले. थोडा वेळ गेला. माधवरावांनी राम म्हटला! विमल व कृष्णनाथ! त्यांचे दु:ख शब्दातीत होते.
आणि माधवराव मरुन तीनच दिवस झाले होते; तो आत्याबाईही अकस्मात देवाघरी गेल्या!
‘मी त्याच्यासाठी होते. तो गेला; आता माझे काम संपले!’ एवढेच त्या म्हणाल्या. आत्याबाईंचे आपल्या भावावरचे प्रेम पाहून विमल व कृष्णनाथ यांना आश्चर्य वाटले. आत्याबाई जणू इच्छामरणी होत्या.