आपण सारे भाऊ 77
‘काय आहे काम?’ त्याने विचारले.
‘तुमच्यावर वॉरंट आहे, हिंदुस्थान संरक्षण कायद्याखाली.’
विमलही खाली आली.
‘विमल, मी तुरुंगात चाललो. काही न करता तुरुंग! हातून काही होऊन मग तुरुंग मिळता तर किती छान झाले असते!’
‘बाबांची शपथही पाळल्याप्रमाणे झाली आणि तुम्हांलाही मनाचे समाधान मिळेल. जा! पाठीमागची व्यवस्था करुन मीही पाठोपाठ येते. कृष्णनाथ, जा! आपण स्वातंत्र्य भारतात पुन्हा भेटू!’
‘माझे कपडे व चरखा दे. विमल, काही पुस्तके दे.’
सारी तयारी झाली. कृष्णनाथ मोटारीतून गेला. एकटी विमल, रात्रभर तशीच बसून होती. तिला कशी झोप येणार?
कृष्णनाथ तुरुंगात होता; तो कधी सुटेल याचा नेम नव्हता. तो आपला वेळ वाचनात दवडी. वादविवादात त्याला फार रस नव्हता, परंतु कधी गंभीर प्रश्नांची चर्चा चाललेली असली, तर तो तेथे जाऊन बसे, ऐके. संध्याकाळी तो खेळ खेळे.
एके दिवशी विमललाही अटक झाल्याचे त्याने वाचले. त्याला आनंद झाला. तो एकटा फे-या घालीत होता. आनंदी असला तरी तो विचारमग्नही होता.
‘काय कृष्णनाथ, कसला करतोस विचार?’ एका मित्राने येऊन विचारले.
‘माझ्या पत्नीलाही अटक झाल्याचे वृत्त आज आले आहे.’
‘तुझी चिंता मिटली. घरी एकटी असेल असे तुला सारखे वाटे. आता जार मंडळीत आली, वेळ हा हा म्हणता जाईल!’
‘कोठल्या तुरुंगात ठेवतील तिला?’
‘येरवडयाला, स्त्रियांना बहुधा येरवडयास ठेवतात. तेथे पुष्कळ स्त्रिया आहेत. खानदेशाच्या त्या लीलाबाई पाटीलही त्याच तुरुंगात आहेत.
त्यांना साडेसहा वर्षांची शिक्षा आहे.’
‘साडेसहा वर्षांची?’
‘हो, परंतु ज्या वेळेस न्यायाधीशाने शिक्षा दिली, त्या वेळेस त्या काय म्हणाल्या, माहीत आहे का?’
‘काय म्हणाल्या?’