आपण सारे भाऊ 82
रघुनाथ नि रमा मुले वाचत होती म्हणून आनंदी होती. परंतु घरात खाण्याची ददात पडे म्हणून दु:खीही होती. त्यांची मोठी मुलगी सिंधु ही आता आठ वर्षांची होती. तिच्या पाठीवर तीन मुले झाली. दोन मुलगे नि एक मुलगी अंगावर होती. मुलांची नावे रमेश नि उमेश. अंगावरच्या मुलीचे नाव चंपू होते. रमेश पाच वर्षांचा होता. उमेश दोन अडीच वर्षांचा होता. चंपू नुकतीच उपडी वळू लागली होती. चार मुले घरात. कसा चालायचा संसार?
रघुनाथचे राहायचे घर फक्त शिल्लक होते. परंतु तेही गहाणच होते. आज ना उद्या त्या घराचाही लिलावच होणार होता! मुलेबाळे घेऊन कोठे जावयाचे? नोकरीचाकरी करण्याची संवय नाही. श्रीमंतीची वाढलेले जीव! एके दिवशी एक गृहस्थ त्यांच्याकडे आले. ते म्हणाले.
‘तुमची वाईट दशा आहे हे ऐकून मुद्दाम तुमच्याकडे आलो आहे. माफ करा. पण तुम्ही मुंबईस का नाही जात? वाटेल तेथे नोकरी मिळेल. नाही तर लढाईवर जा! घरी वेळच्या वेळेस पगार मिळेल!’
‘लढाईवर जाण्यापेक्षा येथे मेलेले काय वाईट!’
‘लढाईवर गेलेत तर पोरे उपाशी मरणार नाहीत!’
‘आणि तिकडे मीच मेलो म्हणजे? पुन्हा प्रश्न आहेच ना? काय व्हायचे असेल ते येथेच होऊ दे!’
‘अहो, येथे तरी कोण तुम्हांला राहू देणार आहे? सावकार घराचा लिलाव पुकारणार आहे! उद्या घर खाली करुन बाहेर पडावे लागणार आहे. तुम्ही लढाईवर जा. सरकार घराचा लिलावसुध्दा थांबवील. तुम्ही तिकडे गेलेत, तर घरच्यांस पेन्शन मिळेल. सरकार काळजी घेईल!’
‘मला एवढा आग्रह करता ते तुम्ही का नाही जात?’
‘अहो, हजारोंचा आजा मी पोशिंदा झालो आहे. किती तरी लोकांना दिले पाठवून लढाईवर. त्यांच्या घरी कशाला कमी नाही. त्यांना आधी रेशनिंग. दर महिन्याला नेमकी मनिऑर्डर.’
‘तुमचीसुध्दा बरीच इस्टेट झाली आहे म्हणे. एक रिक्रूट पाठविला म्हणजे पाच की दहा?’
‘मी काही पैशासाठी करीत नाही. ही भूतदया आहे नि देशसेवाही आहे.’
‘तुम्हांला एक प्रश्न विचारु.’