आपण सारे भाऊ 78
‘इतकीच का शिक्षा?’ असे त्या हसून म्हणाल्या. इतकी शिक्षा दिली गेलेली महाराष्ट्रातील तरी हीच पहिली स्त्री!’
‘शिक्षा झालेल्या आणि स्थानबध्द अशांना एकत्र असतील ठेवीत?’
‘स्त्रियांना एकमेकींना भेटू देत असतील. ते जाऊ दे. परंतु तू कसले विचार करीत होतास?’
‘ती रात्री चर्चा चालली होती ना, तिचा माझ्यावर गंभीर परिणाम झाला आहे!’
‘काँग्रेसच्या ठरावाची चर्चा ना?’
‘हो, त्या ठरावांत काँग्रेस म्हणते की, आम्हांला शेतात श्रमणारे नि कारखान्यात श्रमणारे यांना स्वराज्य द्यायचे आहे. आणि शेतात असणा-यांना स्वराज्य द्यायचे याचा अर्थ जमीन सर्वांना वाटून द्यायची असा आहे.’
‘काँग्रेसच्या कार्यकारी मंडळांत चर्चा होऊन असा अर्थ निश्चित झाला होता असे म्हणतात.’
‘तसे असेल तर मी माझी जमीन वाटून द्यायला नको का?’
‘उद्या तसा कायदा झाला म्हणजे आनंदाने तयार हो.’
‘समजा, उद्या मी सुटलो नि शेक-यांना जाऊन सांगू लागलो की, स्वराज्य तुम्हांला द्यायचे आहे, तुम्हांला जमीन द्यायची आहे, तर ते लगेच विचारतील, तुमच्या जमिनीचे काय?’
‘त्यांना उत्तर दे, माझ्या जमिनीवर मी पाणी सोडले आहे. ती माझी नव्हतीच मुळी. अन्यायाने मी ती माझी समजत होतो. उद्या तसा कायदा झाला म्हणजे त्याप्रमाणे मी आनंदाने करीन. एवढेच नव्हे तर तसा कायदा, हाती खरी सत्ता येताच काँग्रेसने करावा, म्हणून मी हट्ट धरीन. तशी चळवळ करीन. मी माझे मरण डोळयांनी बघत आहे, माझी जमीन तुम्हांला दिली जात आहे, असे दृश्य मी आनंदाने बघत आहे. वास्तविक ते माझे मरण नसून तो माझा उध्दार आहे. आजपर्यंत अशी शेकडो एकर जमीन ताब्यात ठेवून माझ्या आत्म्याचा मी वधच केला होता. तुमच्या सर्वांच्या जगण्यातच माझे खरे जगणे आहे. ख-या जीवनाचा मार्ग माझी काँग्रेस मला दाखवीत आहे, असे तू त्यांना सांग!’
‘परंतु काँग्रेसने कायदा करीपर्यंत तरी मी कशाला थांबू? उद्या सुटल्यावरच हा प्रयोग करावा असे माझ्या या मनात आहे. २५ शेतक-यांची कुटुंबे माझ्या शेतीवर राहू शकतील. मी २६ वा. त्यांच्यातच. प्रत्येकाला स्वतंत्र सुंदर झोपडी. त्यांच्या मुलांची शाळाही चालवीन. रात्री या बंधूंना मी शिकवीन. मी जर खरा काँग्रसचा असेन, खरा गांधीवादी असेन, तर असे नको का करायला?’
‘तुझ्या मनाला एरव्ही समाधान नसेल वाटत तर तसे कर.’