आपण सारे भाऊ 12
‘नको, निजू दे. रात्री बराच वेळ बसला होता. त्याला समजते हो सारे.’
‘आई, बोलू नकोस, फार दम लागतो बघ तुला.’
‘अरे, हे शेवटचेच बोलणे. निरवा निरवीचे. गंगा आणून ठेव तुळशीपत्र आणून ठेव. त्यांच्या आधी मलाच जाऊ दे.’ सगुणाबाई एकदम मुक्या झाल्या.
‘आई!’ रघुनाथने हाक मारली.
‘सासूबाई!’ रमाने हाक मारली.
हाकेला उत्तर कोण देणार? आईचे डोळे मिटले होते. रघुनाथ खाली गेला. त्याने देवांतील गंगा आणली. तुळशीपत्र आणले.
‘आई, गंगा हवी ना?’
ओठ उघडले गेले. दोन थेंब ओतण्यात आले. गंगेचे पाणी आम्ही सारे भारतीय एक, हे मरतानाही अनुभवीत असतो. एका गंगामातेचे पाणी पिऊन प्राण सोडीत असतो. अशी देवभक्ती जगात नाही. आपल्या कोणत्या देशातील लोकांना वाटत असेल? ही भारतीय भावना आहे.
‘रघुनाथ!’ पलीकडच्या खोलीतून हाक आली.
रघुनाथ धावतच गेला.
‘काय, बाबा?’
‘ती बघ पुढे गेली. मीही जातो. सांभाळा सारी. माझा कृष्णनाथ लहान आहे. जरा हट्टी आहे. तुम्ही त्याचे आईबाप व्हा.’
‘बाबा!’
‘सांभाळ; रमा कोठे आहे?’
त्याने तिला हाक मारली.
‘काय मामंजी?’