आपण सारे भाऊ 36
‘छान आहे भूपाळी.’
‘अरुणला तुम्ही शिकवा.’
‘आज आई-बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता!’
‘कृष्णनाथ घरात नाही. त्याचाही त्यांना आनंद झाला असता का?’
‘ती आठवण नको.’
‘बायका विचारीत, कृष्णनाथ कोठे आहे?’
‘तू काय सांगितलेस?’
‘शिकण्यासाठी आदर्श छात्रालयात त्याला ठेवले आहे.’
‘छान!’
‘परंतु मी सांगू का? आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे.’
‘कोणती?’
‘कृष्णनाथ मेला म्हणून एक दिवस रडण्याची!’
‘आणि सर्कशीतून तो आला तर?’
‘सिंह-वाघाच्या जबडयातून कोणी परत येत नसतो.’
‘आजच नको त्याचा विचार. आनंदाचा दिवस.
‘अरुणच्या सुखी भविष्यकाळाचा अरुणोदयही आजपासूनच सुरु होऊ दे. त्याचा विचार आतापासूनच सुरु होऊ दे.’
रमा, तू उतावळी आहेस.’
‘काही गोष्टी ताबडतोब करायच्या असतात. घरात मुडदा झाकून ठेवून शेतकरी पेरणी करायला जातात. तुम्ही बावळट आहात!’
‘तू हुशार आहेस ना? दोघे बावळट नाहीत हे का कमी?’