आपण सारे भाऊ 1
तिन्ही सांजांची वेळ होती. शाळा सुटली होती. कृष्णनाथ पळतच घरी आला. घरी रघुनाथ व त्याची पत्नी कॅरम खेळत होती.
‘दादा, आई कुठे आहे?’
‘आई व बाबा कथेला गेली आहेत.’
‘मला खायला कोण देईल? मला लागली आहे भूक. वैनी, तू देतेस खायला?’
‘जा, तेथे पोळी आहे ती घे. द्यायला कशाला हवी? तुला हात नाहीत वाटते!’
‘मी नाही घेणार. तू दे. आणि पोळीशी साखरांबा पण वाढ. दे ना गं वैनी!’
‘आमचा खेळ आटपू दे, मग देईन.’
‘मी खेळ उडवून देईन.’
‘दे बघू उडवून? कसा उडवतोस तो बघतो! जा तिकडे.’ रघुनाथ रागाने ओरडला.
परंतु कृष्णनाथाने त्यांचा डाव खरोखरच उधळून टाकला. आणि रघुनाथने त्याला मारमार मारले.
‘माजलास होय तू? पुन्हा करशील असं? उडवशील खेळ?’
‘उडवीन. होय उडवीन-शंभरदा उडवीन.’
‘नुसता लाडोबा करुन ठेवला आहे त्याला. मी आपली बोलत नाही. परंतु उद्या सर्वांच्या डोक्यावर बसेल. माझी सत्ता असती, तर सुतासारखा सरळ केला असता. पोरांना शेफरवून चालत नाही. जा, ती पोळी खा. तेथे ठेवली आहे.’ रमावैनी म्हणाली.
‘मला नको जा ती पोळी. आई आल्यावर देईल. तुझ्याजवळ कधी मागणार नाही.’
‘किती दिवस आई पुरणार आहे? उद्या माझ्याशीच गाठ आहे.’