नामदार गोखले-चरित्र 125
एकदा तर ते बारा तास पत्ते खेळत बसले होते. आपण जिंकू असे त्यांस वाटे. क्रिकेटचा त्यांस नाद होता. सुधारकामध्ये 'क्रिकेट'वर वगैरे त्यांनी लेख लिहिले होते. एकदा एका बोटीत ते तिकडचा एक नवीन विलायती खेळ मोठ्या उत्सुकतेने शिकत होते. एकाने त्यास विचारले- 'तो खेळ खेळण्यात आपण येवढे का दंग झाला आहा?' ते म्हणाले, 'आम्ही प्रत्येक खेळात तुमच्या तोडीचे आहोत कोणत्याही गोष्टीत हिंदी मनुष्य मागे पडत नाही हे आम्ही दाखवून दिले पाहिजे.' अशा बारीकसारीक गोष्टीसुध्दा आपण देशाच्या दृष्टीने कराव्या. रामतीर्थ म्हणत, 'माझा श्वासोच्छ्वास सुध्दा देशासाठीचा आहे.' असो. खेळणबिळणे त्यांस आडवत असे. कपड्यात नोक-झोक नसला तरी देश तसा वेश ते करीत. कपड्याची घडी, इस्तरी बिघडू नये म्हणून ते फार जपत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी त्यांच्या कपडयालत्त्यांविषयी विशेष काळजी घेत. परंतु एकंदरीत ते साधेच होते. त्यांचा पोषाख सभ्यतेसाठी असे; दिमाखासाठी नसे. त्यांस कसलेही व्यसन नव्हते. १८९७ पूर्वी ते चहासुध्दा पीत नसत. इंग्लंडहून आल्यावर मात्र ते चहा घेऊ लागले. विडी, सुपारी वगैरेचे तर त्यांस वारेही नव्हते. विडीच्या धुराचा वास त्यांस अगदी सहन व्हावयाचा नाही. त्यांच्या घरातील कोणा माणसाने विडी वगैरे ओढली असता, त्यांस जर गोपाळरावांनी बोलाविले, तर तो वेलदोडा, लवंग, काही तरी खाऊन मग पुढे जावयाचा. एकदा दत्तोपंत वेलणकरांस काही हिशेब पाहण्यासाठी गोपाळरावांजवळ जाण्याची वेळ आली. त्यांनी विडी ओढली होती. त्यांच्या खिशांत लवंगा व वेलदोडे असावयाचेच. ते वेलचीचे दाणे खाऊन गोपाळरावांपासून जरा दूरच बसले. 'असे इकडे जवळ बसा, लांब बसून कसे चालेल?' दत्तोपंत हळूच पुढे सरकले. विडीचा वास खपला नाही. 'तुम्ही विडी ओढली वाटते?' गोपाळरावांच्या समोर खोटे बोलण्याची प्राज्ञाच नसे. 'होय' असे दत्तोपंत म्हणाले. 'आता तुमचे वयच आहे म्हणा ओढण्याचे !' येवढेच ते म्हणाले.
पुण्यास असले तरी ते सर्वदा सोसायटीतील आपल्या बैठकीच्या जागी असावयाचे. जेवणखाण सर्व तेथेच. फक्त दिवाळीच्या दिवशी आपल्या मित्र-मंडळींसह घरी जाऊन फराळ करावयाचे. इतके त्यांचे सोसाटीवर प्रेम असे. सोसायटीविषयी किंवा तिच्या उदात्त हेतूविषयी कोणी थट्टा केल्यास त्यांस आवडत नसे. एकदा नेव्हिन्सन् जेव्हा पुण्यास आला होता, तेव्हा त्यास व इतर मित्रमंडळीत गोखल्यांनी सोसायटीत फराळास बोलाविले. केळीची पाने वगैरे सर्व देशी थाट होता. नंतर विडे वगैरे झाले. गप्पागोष्टी निघता निघता 'इंग्लंड व हिंदुस्थान यांचा संबंध परमेश्वराने आणला आहे'- आणि गोखल्यांच्या सोसायटीच्या ध्येयपत्रिकेतील ''या शब्दांविषयी वाद निघाला. सर्वजण हंसले; परंतु गोपाळरावांस हंसू आले नाही. त्यांच्या तोंडावर गांभीर्य व विचारसौंदर्य हीच प्रतिबिंबित झालेली होती. ज्या गोष्टीवर आपली आत्यंतिक श्रध्दा असते, तिची हेटाळणी, वाटाघाट कोणी केल्यास आपणांस राग येतो. परंतु गोखले आपल्या मनोविकारांवर दाब ठेवण्यास शिकले होते.
गोपाळरावांचा स्वभाव नादी होता. एखादी गोष्ट मनात आली की काही दिवस ते तिचाच पिच्छा पुरवावयाचे. एकदा लॅटिन शिकावयाचे मनात आले तेव्हा त्यांनी त्या विषयाची पुस्तके मागविली. परंतु काही दिवसांनी त्यांना त्या पुस्तकांची आठवणही राहिली नाही व पुस्तके धूळ खात पडली. १९०० नंतर जेव्हा त्यांची द्वितीय पत्नी परलोकवासी झाली, रानडेही गेले आणि १८९७ चे शल्य अजून टोचतच होते, अशा मनाच्या अत्यंत अशान्त स्थितीत, त्यांच्या काही मित्रांनी त्यांस गाणे शिकण्यास विनंती केली. गाणे ही एक दैवी कला आहे; हा पंचम वेद आहे; दु:खी जगाचा, त्रासाचा, उद्विग्नतेचा विसर पाडून निर्विकल्प अशा आनंदसागरात पोहावयास लावणारी ही गायन कला धन्य होय! गाण्याच्या आलापाने विलापाचे परिवर्तन होते; हृदय हलके होते; मन मोकळे होते. गोपाळरावांस हे म्हणणे पटले आणि त्या वेळचे प्रसिध्द गाणारे बाळकोबा नाटेकर यांस त्यांनी आपणास गायन शिकविण्यासाठी ठेविले. लगेच सांगली मिरजहून तंबोरे, तबले, सतारी यांचा साग्र संच जमविला. परंतु शेवटी बाळकोबा म्हणाले, 'तुम्ही जन्मभर शिकलां तरी तुम्हांला गाणे येणार नाही.' हा अव्यापारेषु व्यापार होता. कारण गाणे ही ईश्वरी देणगी आहे. प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी विशिष्ट कार्यार्थ निपजलेला असतो. सर्वत्र सारखे प्राविण्य मिळविणारा असा गटेसारखा एखादाच महापंडित निघतो. व्याख्याने वगैरे देताना जरी गोपाळरावांचा आवाज परिणामकारी असला तरी गाण्यात काही जमेना. शेवटी त्यांनी हा नाद सोडून दिला.