नामदार गोखले-चरित्र 61
१९०४ मध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक प्रांताने आपआपले प्रतिनिधी चळवळीसाठी इंग्लंडात पाठवावयाचे ठरले होते. कर्झन साहेबांच्या दुष्ट कृत्यांची व त्या कृत्यांचा कळस जो फाळणीचा कायदा त्याची विलायतेतील लोकांस नीट कल्पना देण्यासाठी शिष्टमंडळ पाठविणे अधिकच जरूर झाले. ब्रिटिश मालावर बहिष्कार का घालण्यात येत आहे, त्यात सूडाची भावना नसून इंग्लंडला जागे करण्याचा हा एक उपाय आहे हे विलायतेतील जनतेस- मजुरांच्या समुदायांस पटवून देणे अगत्याचे होते. ३ मे १९०५ रोजी मुंबईस जाहीर सभा भरून मुंबई इलाख्यातर्फे गोखल्यांस विलायतेत पाठविण्याचे ठरले. तेव्हा गोपाळराव हिंदुस्थानातील काम बाजूस ठेवून विलायतेस चालले. विलायतेस त्यांच्याविरुध्द उठलेले काहूर आता शमले होते. प्रत्यक्ष गव्हर्नर जनरलने त्यांस गतवर्षी सी. आय. ई. ही बहुमानाची पदवी स्वदस्तुरचे पत्र लिहून दिली होती. तेव्हा त्यांच्या सद्हेतूविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी व सत्य स्पष्टोक्तीविषयी विलायतेतील लोकांस अंदेशा बाळगिण्याचे कारण नव्हते. आपणास विलायतेत समाधानकारक व जबाबदारपणे काम करिता यावे याच एका हेतूने गोखल्यांनी ही पदवी स्वीकारली होती. कौन्सिलातील सर्वश्रेष्ठ असा लोकप्रतिनिधी विलायतेत जात होता. ज्याच्या सणसणीत परंतु रास्त टीकेने कर्झनसाहेबास संताप न येता प्रसन्न केले, असा नेमस्त परंतु योग्य ती खरडपट्टी काढण्यास न भिणारा लोकनायक आता इंग्लंडला जात होता. त्यांच्या शब्दाला इंग्लंडात मान मिळेल; त्यांचे तेथे वजन पडेल अशी आता सर्वांची व स्वत: गोखल्यांचीही खात्री होती आणि म्हणूनच ते आपल्या दु:खी देशाची दीन कहाणी विलायतेतील निरनिराळ्या लोकांस ऐकविण्याकरिता निघून गेले.
इंग्लंडात गोखले गेले ते मोठ्या योग्य वेळी गेले. इंग्लंडमध्ये नवीन निवडणुकी व्हावयाच्या होत्या. जुने मंत्रिमंडळ जाऊन नवीन उदारमताचे मंत्रिमंडळ अधिकारारुढ होणार होते. बाल्फोर साहेबांच्या प्रतिगामी मंत्रिमंडळाची फार नाचक्की झाली होती. नवीन निवडणुकीने उदारमतवाल्यांचे फारच मताधिक्य झाले होते. अशा वेळी हिंदुस्तानातील दु:खेही समर्पक व हृदयस्पर्शी भाषेत सांगणे फार हिताचे होते.
गोखल्यांनी इंग्लंडमध्ये अविश्रांत चळवळ केली. हिंदुस्तानातील साग्र हकीकत त्यांनी करुण रवाने गाइली. मँचेस्टर येथे ६ आक्टोबर १९०४ रोजी त्यांनी हिंदुस्तानातील असंतोष या विषयावर सुंदर व्याख्यान दिले. हे आख्यान व्यापाराची मोठी पेठ जी मँचेस्टर तेथे होते! मँचेस्टर आणि लिव्हरपूल यांस हिंदुस्तान म्हणजे बाजारपेठ. हिंदुस्तान त्यांच्या पोटास देत होता. परंतु हिंदुस्तानात आता या मालावर बहिष्कार पुकारण्यात आला होता. गोखल्यांस त्यांचे मित्र सांगत होते की, तुम्ही तेथे व्याख्यान देण्यास जाऊ नका. तेथील लोकांची मने हिंदुस्तानविरुध्द क्षुब्द झाली आहेत. परंतु गोपाळरावांस कर्तव्य करावयाचे होते, सर्वांची सहानुभूती त्यांस मिळवावयाची होती. त्यांनी बंगालची फाळणी करण्यातील धोरण येथे उघड केले. बंगाली लोक एके ठिकाणी असल्यामुळे त्यांचे सर्व देशात व त्या प्रांतात फार वर्चस्व आहे. बंगाली लोकांमधील ऐक्यवृत्ती व त्यांच्या वाढत्या राष्ट्रीय आकांक्षा चिरडण्यासाठी, बंगाली लोकांची संख्या दोन निरनिराळ्या प्रांतांत विभागून त्यांचे प्रत्येक प्रांतात संख्याबल व त्यामुळे मतबल कमी करणे हा सरकारचा हेतू होता, बंगाली लोक हाडाचे गरीब, ते बुद्दीने कोणास माघार न जाणारे, देशप्रेमाने ओथंबवलेले, सरकारचे कृष्णकारस्थान कळताच त्यांचे उघडू लागणारे डोळे साफ उघडले, त्यास त्वेष आला. आम्हा लोकांस या सरकारने एखाद्या किड्यामुंगीप्रमाणे मानून चिरडावे याची त्यांस चीड आली. स्वत:मधील दैन्य, स्वत:मधील दुर्बलता नाहीशी करण्याचा त्यांनी चंग बांधला. इंग्लंडमधील लोकही आपल्या न्याय्य आकांक्षा परिपूर्ण करण्यास पुढे येत नाहीत. त्यांनी पुढे यावे म्हणून बंगाली लोकांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार पुकारला. या गोष्टीमुळे मँचेस्टर वगैरे शहरातील लोकांस आम्हांस रागच आणावयाचा होता. गोखले सांगतात -
"I am not sorry that you are angry, because I want you to be angry, but I want you to turn your anger not against the helpless people who have been driven to the last possible measure that they could take in an extremity, but against those officials of yours who are responsible for the unhappy situation that has been brought about.''