नामदार गोखले-चरित्र 88
१९०९ च्या आरंभी त्यांस अमेरिकेत व्याख्याने देण्यासाठी मोठ्या मानाचे निमंत्रण आले होते. परंतु १९०८ त्या उत्तरार्धात ज्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या, त्यांचे नियम, कायदे वगैरे सर्व या वर्षी करावयाचे असल्यामुळे गोखल्यांस या विनंतीचा साभार स्वीकार करिता येईना. आपल्या देशातील काम सोडून अन्यत्र बडेजावासाठी गोपाळराव जातील ही कल्पनाही होत नाही. १९०९ च्या फेब्रुवारी महिन्यात, सुधारलेले बिल पार्लमेंटपुढे मांडण्यात आले. अल्प वादविवाद होऊन १९०९ च्या मे महिन्यात कायदा जाहीर करण्यात आला. १९०६ च्या मे महिन्यात मिंटो म्हणाले होते - 'The possibility of the development of administrative machinery in accordance with new conditions.' याचा विचार करण्यात येईल. १९०७ मध्ये खर्डा तयार झाला. १९०८ मध्ये तो सुधारून नीट करण्यात आला. १९०९ च्या मे महिन्यात कायदा म्हणून पास झाला व तीन वर्षे या कायद्याचा बोलबाला होत होता. परंतु या कायद्याने जे दिले ते हिंदुस्तानातील नियम, घटना वगैरेंनी बरेचसे हिरावण्यात आले. यामुळे त्यात तथ्य असे विशेष राहिले नाही. सुधारणा संकुचित करण्यात आल्या. जणू हिंदुस्तानास हा घास पचणार नाही असे सरकारास वाटले! नेमस्त पुढा-यांस, गोखल्यांस या गोष्टीचा फार संताप आला. परंतु संतापाव्यतिरिक्त दुसरे काय करणार! कदाचित हे नियम घालण्यास देशातील वाढते अत्याचार कारण झाले असावे. बंगालमध्ये खून, दरवडे, बाँब यांचा सर्वत्र धूमधडाका चालला होता. महाराष्ट्रात नाशिकसारख्या ठिकाणी कट उघडकीस आले. रोज नित्य अत्यातारांची बातमी असावयाची. सरकारच्या कच्छपी असणारे देशी अधिकारी, गोरे लोक यांचे बळी कोठे कोठे पडू लागले. या परिस्थितीत गोपाळरावांनी मुंबई व पुणे येथे व्याख्याने दिली. अशा क्रांतिकारक वातावरणात शांततेचा दीप दाखविणे किती कठीण असते? भ्याड, सरकारशी हितगुज करणारे, देशद्रोही अशा पदव्या बहाल होत असतात. गोखल्यांस या गोष्टींची पर्वा नव्हती. लोकांच्या बेफाम मनास न रुचणारा परंतु परिणामी पथ्यकर असा उपदेश करण्यास ते कचरले नाहीत. या अत्याचारांनी सरकारचा एक रोमही वाकडा होणार नाही. आपले उमदे, वीर्याचे धैर्याचे शेकडो बांड, तरुण, मात्र प्राणांस मुकतील; फासावर लटकाविले जातील; काळ्या पाण्यावर पोचविण्यात येतील. ज्या स्वार्थत्यागापासून यत्किंचितही फायदा नाही तो करण्यात स्वार्थनिरपेक्षता दिसली, प्राणांची बेपर्वाई दिसली मातृभूमीचा फायदा नाही. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहो असे त्यांनी सांगितले. आशावादी बनून प्रयत्न करा. सर्व लोकांत संघटना करा आणि हे संघटन, ही एकी झाली, एका कार्यासाठी हजारो, लाखा लोक पुढे येऊ लागले की, करबंदीसारखी जी पूर्ण सनदशीर चळवळ आहे ती हाती घ्या. परंतु आज एक अधिकारी मारा आणि त्याबदला स्वत:चे तीन-चार इसम फाशी, पाचसहा जन्मठेप काळ्या पाण्यावर असे करून घेण्यात काय फायदा आहे? या प्राणाहुतींनी निजलेले जागे होतील. या प्राणार्पणाने आळशी पुढे येतील. देशसेवेसाठी स्वार्थावर कसा बहिष्कार घालावा लागतो ते त्यांस समजेल. हा फायदा लहानसान नाही आणि सर्वच वेळा फायदा काय हे पाहून चालत नाही. ज्या सरकारच्या राज्यात जगण्यासारखे काही नाही तेथे मेलेच पाहिजे अशी वृत्ती या तरुण वीरांनी दुस-यात उत्पन्न केली खरी. परंतु त्यांचे हृदयद्वावक परिणाम ज्यांनी पाहिले व ऐकले ते कचरले. यापासून देशाची वास्तविक काही प्रगती होईल का? अफाट सामर्थ्याच्या सरकारविरुध्द असहाय, एकाकी व नि:शस्त्र लोक कसे टिकणार? हा मार्ग भावनेस पटला, हृदयास रुचला तरी बुध्दीस पटत नाही. अन्य मार्गांनी चला. खुनाचे का कोठे स्वराज्य मिळते? त्यासाठी मोठी बंडे करावी लागतात. बंड करण्यास शस्त्रे कोठे आहेत? परकी सरकारासही आधी बोलविता येत नाही. सारांश काय, लढाईचा मार्ग आपणांस बहुतेक बंद आहे. त्या मार्गाने आपल्या प्रचंड देशास जाता येणार नाही. लढाई पुन: सुरू झाली तर सरकार जरा गांगरेल. समजा: फक्त बंगालमध्ये सुरू झाली आणि इतर प्रांत स्वस्थ राहिले तर काय होईल? बंगालचा मात्र नायनाट होईल. तेव्हा सर्व देशात एकच सूर निघावा, सर्वांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असावे, एकच विचार मनात खेळावा, हिंदु मुसलमान एकदिल व्हावे, मग आपणांस उठाव करिता येईल. तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा, संघटित व्हा, स्वार्थत्याग शिका आणि शिकवा हे दिवस तयारीचे आहेत. अद्याप शेकडा सत्तर लोकांस देशातील स्थितीची जाणीव देखील नाही. तेव्हा सर्वांस हलवून जागे करा आणि हे कार्य झाले म्हणजे मग पुढे पाहता येईल. लोकांच्या मनास रुचेल असे बोलणे गोपाळरावांस आवडत नसे. स्वत:च्या बुध्दीस जे पटेल तेच ते सांगत. सध्या आपले बोल कटू वाटले, विषमय वाटले, तरी परिणामी तेच हितकर ठरतील असे त्यांस मनापासून वाटे. लोकांनी त्यांस माथेफिरू, सरकारलेला असे म्हणण्यात कमी केले नाही. परंतु गोपाळराव हे रानड्यांचे शिष्य होते. ते आपला संताप आवरण्याचा प्रयत्न करीत.