नामदार गोखले-चरित्र 7
असले भिकार मोह त्यांनी आपल्या शुध्द आत्म्यास कधीही होऊ दिले नाहीत तर देशहिताची शुध्द, पवित्र आणि थोर चिंताच रात्रंदिवस वाहिली म्हणूनच ते एवढया महत्पदाला चढले.
येणेप्रमाणे गोपाळरावांचे आंगच्या अनेक गुणांपैकी निवडक सहा गुणांचे स्वरूप व महत्त्व येथवर वर्णन केले. त्याची ही षड्गुणैश्वर्यसंपन्नता पाहून गोपाळरावांचा कोणालाही हेवा वाटेल आणि जर त्यांचे अनुकरण करण्याचे कोणी मनात आणील तरच हे गुण गोपाळरावांनी वाढीस लावल्याचे चीज झाले असे म्हणता येईल. रा. साने यांनी गोपाळरावांच्या आंगचे हे गुण फार रसाळपणाने व कळकळीने वर्णन केले आहेत व त्याचा ठसा आपल्या मनावर वाचक उठवून घेऊन कृतार्थ होतील, अशी आशा आहे.
नामदार गोखले यांचे गुण आपण वर्णिले; परंतु त्यांच्या प्रत्यक्ष कार्याविषयी थोडा विचार केल्याशिवाय ही प्रस्तावना पुरी करता येत नाही. गोपाळराव गोखले यांच्या सर्व कार्यात आमच्या मते भारतसेवक समाजाची स्थापना ही सर्वात श्रेष्ठ कामगिरी होय. अशी संस्था अखिल भारतवर्षात दुसरी नाही. 'पोलिटिकल संन्यासी' निर्माण करावे म्हणून ही संघटना गोपाळरावांनी केली. यासाठी संथपणे खपून व आपले सर्व वजन खर्चून त्यांनी निधी जमविला आणि लायोला किंवा रामदास यांच्याप्रमाणे आद्य सभासद म्हणून सर्व व्यवस्था स्वत: केली. राजकीय व आर्थिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट ग्रंथसंग्रह येथे करण्यास त्यांनी आरंभ केला होता. आणि ते जर सुदैवाने आणखी बरीच वर्षे जगते तर ही संस्था अत्यंत कार्यकारी करून तिचे नाव जगाच्या इतिहासात बहुत काळ राहील, असा तिचा विकास त्यांनी केला असता. पुण्यासारख्या ठिकाणी इंपीरिअल लायब्ररीसारखे ग्रंथालय स्थापावे हा विचार गोकले यांस मानवला होता आणि आज पुण्यास विद्यापीठ स्थापण्याच्या मागणीत त्यांजकडून खात्रीने चांगलीच मदत झाली असती. त्यांच्यामागे त्यांची जी उपदिष्ट मंडळी हल्ली आहे त्यांजवर हा बोजा आहे आणि त्यांनी भोवतालची परिस्थिती कशी झपाटयाने बदलत आहे व या वावटळीत आपण खरोखरच किती पुढे गेलो आहोत याचा नक्की अंदाज करून जर आपली हालचाल ठेविली नाही तर ते मागे पडतील व गोपाळरावांचे कार्य त्या मानाने अपूर्णच राहील. खुद्द गोपाळरावांचेसुध्दा असेच झाले होते की, त्यांचे तोंड सरकाराकडे वळलेले असे; म्हणजे सोसायटी सोडल्यापासून पुढे ते प्रजापक्षातर्फे सरकाराशी वकिली करण्यासाठी सरकारदरबारीच बरेचसे राहिले. तरी पण त्यांचा आत्मा स्वलोकांत वावरत होता. आणि म्हणूनच त्यांनी भारत- सेवक-समाजाची स्थापना केली आणि म्हणूनच दहांपैकी नऊ हिस्से काम स्वदेशातच केले पाहिजे असे त्यांनी बजावून सांगितले. खुद्द लोकांकडे तोंड वळवून त्यांना आपले विचार गोपाळरावांनी क्वचित् वेळीच कळविले. हिंदुस्थानाविषयी विलायतेत त्यांनी जितकी व्याख्याने दिली तितकी हिंदुस्थानात दिली नाहीत. तेथे बरेच बोलणे ते कौन्सिलातून करीत. लोकमत तयार करण्याची अवघड कामगिरी त्यांस कितपत साधली असती हा प्रश्न मनोरंजक आहे. लोकमत तयार करण्याचे मुख्य साधन म्हणजे लोकभाषा. जोवर सुशिक्षित मंडळी ही मूकजनतेचे प्रतिनिधित्व बिनबोभाट करीत असे व तो त्यांचा हक्क श्रध्दाळूपणे इतर जनतेने मानला होता तोवर इंग्रजीतून चालणा-या काँग्रेसादी सबा इंग्रजीतून पडणारे वक्तृत्वाचे पाऊस उपयोगी पडेल. परंतु जशी जागृती झाली,जसा गोपाळरावांसारख्यांनी प्राथमिक शिक्षणाचा टाहो फोडला आणि टिळकांसारख्यांनी केसरी गर्जनांनी देश दणाणून सोडला तसा लोकभाषेचा व्यापार अनावर वाढला. आता भविष्यकाळ एकटया इंग्रजीचा नाही. इंग्रजीने इंग्रज काबीज करावयाचा तर लोकभाषांनी लोक आवळावयाची कामगिरी यापुढे करावी लागणार. गोपाळरावांनी लोकभाषेचे प्रभावी हत्यार जर वापरले असते तर त्यांची स्थिती आज फार निराळी असती. साऊथ आफ्रिकेतून आल्यावर आणि क्वचित पूर्वीही गोपाळरावांनी तो प्रयोग करून पाहिला होता आणि त्यांच्या नैसर्गिक सामर्थ्यामुळे जरी तो अयशस्वी होत नसे तरी इंग्रजीइतका तो यशस्वी झाला असेही त्यांस वाटत नसावे. गोपाळरावांचे गुरू या प्रयोगातही पंडित होते. परंतु हा प्रयोग जोराने चालविला असता म्हणजे श्रीशिवाजी उत्सवासारख्या लोकप्रिय परंतु नाजूक प्रकरणांची गोपाळरावांना अडचण उत्पन्न झाली असती! असो. गोपाळरावांचे काळी नवयुगाचा उदय होत होता. तेथूनही बरीच मजल आपण आज पुढे चालून गेलो आहो. अशा वेळी गोपाळरावांचा आपणांस अत्यंत उपयोग झाला असता; परंतु आता आपणां सर्वांवर - केवळ सांप्रदायिकांवरच नव्हे - तो भार आहे. रानडे, चिपळोणकर, आगरकर, टिळक, गोखले- प्रभृति लोकहिताचे 'जागली' आपणात झाले. त्यांची आठवण ठेवून, त्यांचे गुण घेऊन व उपकार आठवून तोच भार आपण पुढिलांवर वाढवून सोपविला
पाहिजे.
फाल्गुन शु.५, १८४६, पुणे.
दत्तो वामन पोतदार