नामदार गोखले-चरित्र 100
९ तारखेस सकाळी टिळक सुव्बारावांकडे गेले. सुब्बाराव टिळकांच्या भाषणातील मुद्दयांचे टिपण करीत होते. ते त्यांनी टिळकांस दाखवून त्यांत चूकदुरुस्ती करण्यास विनंती केली. टिळकांनी एक दोन फरक सुचविले. हा लेख ९ डिसेंबर रोजी तयार झाला, आणि प्रत्यक्ष गोखल्यांच्या घरात तयार झाला! हा लेख गोखल्यांनी पाहिला असला पाहिजे, या लेखात तर 'सरकारवर बहिष्कार' वगैरे काही मजकूर नाही. गोखले म्हणतात, 'सुब्बारावांनी मला लेखाव्यतिरिक्त जी लेखात नाहीत अशी टिळकांची विधाने सांगितली. ती विधाने या लेखात नसली तरी त्यांवरून टिळकांचे अंतरंग दिसून येते. परंतु गोखल्यांच्या या म्हणण्यात काही अर्थ नाही. मनुष्य मोकळेपणाने बोलताना अंतरीच्या अनेक गोष्टी बोलतो. मसुदा आणि खासगी भाषण यांत गोखल्यास काहीच फरक दिसत नाही; आम्हांस तर तो किती तरी दिसतो. मनांत पुष्कळ गोष्टी असतात; पण त्या करता थोडयात येतात? २५,००० लोक मिळाले असते तर टिळकांनी बंड सुध्दा पुकारले असते किंवा गोखल्यांनी करबंदीची चळवळ केली असती, परंतु या मनांतील गोष्टी कोणी जबाबदारपणे चव्हाट्यावर मांडीत नसतो. पांढ-यावर काळे करावयाचे म्हणजे त्या शब्दांची जबाबदारी येते. घरात आम्ही वाटेल ते बोलू. सरकारविरुध्द सशस्त्र युध्द पुकारावे असेही म्हणून. परंतु जर समाजात मी हे बोलेन तर मी त्या बोलण्याबद्दल जबाबदार धरला जाईन. मनातील मांडे पुष्कळ असतात, परंतु जबाबदारीने जे लिहिले तेच खरे घेऊन चालले पाहिजे. गोखले याच्या अगदी उलट घेऊन चालले. जे लिहिले त्याच्यापेक्षा बोलणे जास्त खरे असे गोखले गृहित धरून चालले. मनुष्याच्या स्वभावज्ञानासाठी, स्वभावाचे सम्यक आलोचन करताना त्यांच्या बोलण्याला पुष्कळच महत्त्व देणे जरूर आहे. परंतु ही या मनुष्याची मते आहेत असे समाजात सांगणे धाष्टर्याचे असून ते शहाणपणाचेही होणार नाही.
काही असले तरी आमच्या प्रामाणिक व नि:पक्षपाती मनास असेच वाटते की, या वादात गोखल्यांवरच बाजू येते. गोखल्यांनी प्रो. विजापूरकरांस आणखीमध्ये ओढले आहे. प्रो. विजापुरकरही म्हणतात की, सुब्बारावांजवळ टिळक असे बोलले असतील. परंतु ती मनाची दृश्य सृष्टीत न येणारी कल्पनापत्ये काय कामाची? त्या मुत्सद्दयात काय आहे ते पाहा. गोखले म्हणतात, मला मसुदा पाहावयास मिळाला नाही म्हणून मी सुब्वारावांजवळ जे भाषण झाले त्याच्यावरच विश्वासलो. परंतु हा मसुदा खुद्द गोखल्यांच्या घरी झाला असता तो त्यांनी पाहिला नसेल हे संभवनीय दिसत नाही. प्रो. विजापुरकरांचे ज्ञानप्रकाशात एक पत्र प्रसिध्द झाले आहे. परंतु आमचा मुख्य मुद्दा त्याने खोटा ठरत नाही.