नामदार गोखले-चरित्र 19
ज्या वेळेस गोपाळ कोल्हापुरास शिकत होता त्या वेळेस महाराष्ट्रांत जी धामधूम उडाली होती, जो धुमधडाका चालला होता त्याचा प्रतिध्वनी कोल्हापुरासही ऐकू आल्याविना कसा राहील? विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेने एक प्रकारचे नवचैतन्य मृत राष्ट्राच्या देहात ओतण्यास आरंभ केला होता. रानडयांचे कार्य जास्त व्यापकपणे परंतु धिमेपणाने चालले होते. शास्त्रीबोवांनी त्यावेळच्या कित्येक पुढा-यांनी चालविलेले आत्मनिंदेचे कार्य बंद पाडले आणि लोकात तेज आणि आत्मविश्वास उत्पन्न केला. राष्ट्राचा तेजोभंग करून राष्ट्र मेलेले असले तर ते कायमचे मरावे या आत्मनिंदेला आळा घालून आत्मविश्वास अंतरा जागवा आणि त्यास निश्चयाचे पाणी घाला असे शास्त्रीबोवांनी आपल्या तेजोमयी लेखणीने राष्ट्रास पटविले. आत्मनिंदा करून आपणच आपले पाय खच्ची करून घेण्यात, आपण पंगु आहो असा जप करण्यात काय पुरुषार्थ आहे? हातपाय तुटल्यावर मनुष्य धावणार कसा? पुढे घुसणार कसा? दुसरे आपले हातपाय तोडतील तर त्यास अटकाव केला पाहिजे. निदान आपण तरी आपलाच घात करू नये, आपल्याच पायावर स्वत:च्या हातून धोंडा पाडू नये हे तत्त्व शास्त्रीबोवांनी नवीन तरुणांस उपदेशिले. आत्मस्तुती करणे जर वाईट तर आत्मनिंदाही वाईट. सर्व काही प्रमाणात असले पाहिजे. परंतु शास्त्रीबोवा तत्त्वच उपदेशून राहिले नाहीत तर तत्त्वाप्रमाणे कृती करण्यासही ते लागले. रुपेरी शृंखलात निगडित होऊन स्वजनहित उत्तम रीतीने पार पाडता येणार नाही, म्हणून ती तोडून हा नरसिंह रणांगणांत आला. पुण्यास नवीन शाळा उघडण्याचा त्यांनी विचार केला. त्यांचा विचार ऐकून, आधीच त्यांच्या लेखांनी देशकार्यार्थ उद्युक्त झालेले टिळक आणि आगरकर त्यांस येऊन मिळाले. रानडयांनी त्यांस नामजोशांची सुंदर जोड दिली. आगरकर आणि टिळक यांचे कॉलेजमध्ये वादविवाद होत आणि ज्यावर त्यांचे मतैक्य झाले तो प्रश्न म्हणजे शिक्षण हा होय. लोकांस आधी सुशिक्षित केले पाहिजे आणि ते शिक्षण आपल्या हातांत पाहिजे, हा त्यांचा विचार ठाम झाला होता. आगरकर अठरा विश्वे दारिद्रयात वाढलेले, स्वजनांनी टाकलेले आणि लोकांनी हेटाळलेले. रा. ब. महाजनींनी वर्गात कटू बोल उद्गारले, त्या वेळेस तुमच्याप्रमाणेच एम. ए. होईन असे स्वच्छ सांगून चिकाटीने आणि धैर्याने ते एम. ए. झाले. तर्क, न्याय आणि नीतिशास्त्र हे त्यांचे विषय होते. देवाधर्मावरचा त्यांचा विश्वास उडाला असला तरी स्वजनहिताचा नवा मार्ग त्यांस दिसला होता. त्यांस वाढत्या पगाराची सरकारी नोकरी मिळाली असती, परंतु त्यांनी आपल्या आईला लिहिले की 'आई, मी मोठी नौकरी करणार नाही, मी देशकार्यास वाहून घेणार आहे.' असला लोकोत्तर स्वार्थत्याग लोकांस जागे केल्याशिवाय कसा राहील? लोकांची दृष्टी या तरुणाकडे गेली. त्यास पुढे प्रख्यात संस्कृतज्ञ आपटे मिळाले. जास्त तरुण मिळत चालले. शाळा भरभराटत चालली, चिपळूणकर शाळाच काढून थांबले नाहीत तर त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन साप्ताहिके पण सुरू केली. अलीकडच्या काळांत लोकांस परिस्थितीचे सम्यक् ज्ञान करून देण्यास वृत्तपत्रांशिवाय अन्य सुंदर साधन नाही. केसरीची गर्जना आणि मराठयाचा हरहर महादेव घुमू लागला. तरुणांची अंत:करणे थरारून जाऊ लागली. या वेळेस केसरीचे संपादक आगरकर होते. आणि मराठयाचे टिळक होते. टीका करण्यास उभयतांही भीत नसत. गोरे अधिकारी किंवा काळे या दोघांचाही खरपूरस समाचार घेण्यास ते कचरत नसत. १८८० पासून टिळकांचे कोल्हापूरकरांच्या राजाकडे लक्ष होते. १८८० मध्ये पहिले राजे निवर्तले. त्यांच्या दोन राण्या होत्या. वडील राणीस दत्तक देऊन कारभार सुरू झाला. परंतु या नवीन राजास नीट वागविण्यात येत नाही अशी ओरड ऐकू येऊ लागली. त्यास सक्तीने दारू वगैरे पाजतात आणि त्यास वेडा ठरवून नवीन दत्तक गादीवर बसवावयाचे कारभा-यांच्या मनात आहे, अशीही दाट वदंता महाराष्ट्रात उठली. १८८१ च्या २४ नोव्हेंबर रोजी रा. ब. गोपाळराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास जाहीर सभा भरून निषेध व्यक्त करण्यात आला. पुढे टिळक व आगरकर यांस तीन पत्रे उपलब्ध झाली. आणि कारभारी बर्वे यांच्यावर वि, घालण्याचा आरोप त्यांनी केसरी व मराठयातून प्रसिध्द केला. कारभारी बर्वे यांनी फिर्याद केली. ही पत्रे नाना भिडे नावाच्या गृहस्थाने आकसाने लिहिली होती असे सिध्द झाले. टिळक व आगरकर यांची बाजू तेलंग आणि मेथा यांनी मांडिली होती. टिळक व आगरकर यांनी मापी मागितली, परंतु बर्व्यांचे समाधान तेवढयाने होईना. शेवटी १७ जुलै रोजी त्यांस १०१ दिवसांची शिक्षा झाली. त्यांच्यावर दोष इतकाच ठेविला होता की, त्यांनी सदरहू पत्रे विचार न करिता छापिली. या संपादकद्वयास शिक्षा झालेली ऐकून प्रत्येकास सहानुभूती वाटली. सातारच्या वंशासाठी ते झगडले; कारागृहात गेले. त्यांस काही स्वत:चा फायदा मिळवावयाचा नव्हता. त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्यासाठी फंड सुरू झाला. कोल्हापूरकरांचा या बाबतीत जास्तच जिव्हाळयाचा संबंध. तेथील राजाची तरफदारी या स्वार्थत्यागी वीरांनी केली होती. राजराम कॉलेजातील विद्यार्थ्यांनी फंडासाठी नाटक करावयाचे ठरविले. गोपाळ गरीब असल्यामुळे त्यास स्वत: खिशातून पैसे काढून देणे अशक्य होते. त्याने या नाही त्या हाताने मदत करावी म्हणून नाटकात स्त्रीची भूमिका केली होती. ज्या टिळक- आगरकरांजवळ त्यास पुढे जावयाचे होते, त्यांची ही अशी प्रस्तावना आहे