नामदार गोखले-चरित्र 84
दुस-या दिवशी एक वाजता पुन:सभेस आरंभ झाला. टिळकांनी, स्वागताध्यक्ष माळवी यांच्याजवळ एक चिठी दिली. परंतु ही चिठी सर्व काँग्रेस बंद ठेवा अशा अर्थाची आहे असे समजून माळवी यांनी बेकायदा ठरविली, सुरेंद्रनाथांचे भाषण झाले. पंडित मोतीलाल नेहरू यांचेही दुजोरा देण्यासाठी लहानसे भाषण झाले. नंतर मते मागण्यासाठी हा ठराव माळवींनी पुढे मांडला. 'नकारघंटा' वाजू लागली; परंतु ही घंटा 'होय, होय' च्या नगा-यात फिकी पडली. अध्यक्ष निवडले गेले असे माळवींनी जाहीर केले. डॉ. घोष अध्यक्षस्थानी बसून आपले भाषण आरंभताहेत तोच टिळक व्यासपीठावर चमकू लागले. अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल आपण काही सूचना आणणार आहो, व आपण तशी आगाऊ लेखी खबर दिली होती, तेव्हा आपणास बोलू द्या असे ते म्हणाले, स्वागताध्यक्ष म्हणाले, तुमची चिठी अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल नसून सर्व काँग्रेस थांबवावी अशी आहे. अध्यक्ष आता निवडले गेले आहेत, त्यांच्याविषयी आपणांस काहीही बोलता येणार नाही. टिळक म्हणाले, 'माझा हक्क आहे. मी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीही चिठीत लिहिले आहे. अध्यक्षही 'आपण कायदेशीर वागत नाही; जाग्यावर जा.' असे टिळकांस सांगू लागले. परंतु लो. टिळक काय लेचेपेच होते? धीराची मूर्ती, निश्चयाचे मेरूच ते. ते म्हणाले, 'माझे म्हणणे मी प्रतिनिधींसमोर मांडल्याखेरीज राहणार नाही.' झाले; एकच धुमाकूळ माजला. पुष्कळ लोक काठ्या, लाठ्या सरसावून हाणमार करू लागले. टिळकांच्यावरही एक मनुष्य हल्ली करीत होता; परंतु गोखले मध्ये पडले. खर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. इतक्यात एक लाल जोडा फेरोजशहांस चाटून, सुरेंद्रनाथांस लागला. गोखले हा सर्व प्रकार पाहून रागाने नुसते थरथर कापत होते. मेथा, गोखले वगैरे मंडळी मागील दरवाज्याने निघून गेली. टिळकांस त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सुरक्षित नेले, शेवटी पोलिसांनी येऊन दंगल मोडली.
या तारखेस सायंकाळी पुष्कळसे पुढारी जमले. तेथे राष्ट्रीय पक्षाच्या पुष्कळ लोकांस हजर राहू दिले नाही; सुमारे ९०० प्रतिनिधींनी एक कमिटी नेमली आणि तिने सर्व घटना, नियम वगैरे करून एप्रिलमध्ये सभा बोलवावी व सर्वांनी ते पास करावे असे ठरविले. अशा प्रकारे तेविसावी राष्ट्रीय सभा समाप्त झाली.
या एकंदर प्रकारामुळे मनास फार वाईट वाटते. टिळकांचा काही राष्ट्रीय सभा उधळून लावावी असा उद्देश असेलसे दिसत नाही. 'मी सभा मोडली' असे टिळकांनी लिहून दिले तर आपण ऐक्याला- समेटाला तयार आहो, असे राष्ट्रीय पक्षास कळविण्यात आले, तेव्हा टिळकांनी स्वत:च्या शिरावर राष्ट्रकार्याकरिता ही जोखम घेतली, आणि सुरेंद्रनाथ अश्विनीबाबू वगैरेंजवळ तसा लेखी कबुलीजबाब दिला, परंतु त्यांची कोणी गाठही घेतली नाही असे मोतीलाल बाबू 'Step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात. नाना मतांच्या गलबत्त्यात सत्य शोधून काढणे फार कठीण आहे, परंतु टिळकांसारखा माणूस केवळ सभा उधळून लावण्यासाठी आलेला नसावा असे वाटते. बंगालमधून 'Blow up' अशी आलेली तार वाचून पुष्कळजण तारे तोडतात; परंतु यावरून काही टिळकावर आरोप शाबीत होत नाही. बंगाल्यांमधील नवीन रक्ताचे- नवीन दमाचे लोक टिळकांच्याही पुढे गेले होते. टिळक स्पष्टपणे सांगत की, आपणांस साम्राज्यात राहावयाचे आहे; येथे प्रयत्न करून इंग्लंडमध्येही शिष्टमंडळे पाठविली पाहिजेत; यश येण्यास केव्हाही वेळ लागणारच. नवीन क्रांतिकारकांचा विचार सभा उधळून लावण्याचा असेल आणि टिळक त्यांस पूज्य वाटत असल्यामुळे त्यांचे विचार टिळकांवरही पुष्कळ लोक लादू पाहतात, परंतु 'शिष्यापराधे गुरोंर्दंड:' असा हा प्रकार होय.