नामदार गोखले-चरित्र 1
प्रस्तावना
ग्रंथ आणि ग्रंथकार
यांचा अल्प परिचय
कांही एक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ॥
-श्रीसमर्थ
कै. नामदार गोपाळ कृष्ण गोखले या थोर देशभक्ताचे मराठी चरित्र त्यांच्या दहाव्या श्राध्दतिथीच्या शुभप्रसंगी रा. ताम्हनकर हे प्रसिध्द करीत आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. यापूर्वी गोखले यांची एक दोन ब-यापैकी चरित्रे मराठीत प्रसिध्द झालेली आहेत. सांप्रत माझे मित्र रा. नरहरि रघुनाथ फाटक बी. ए. रानडे-चरित्रकर्ते हे गोपाळरावजींचे विस्तृत चरित्र लिहीत आहेत आणि ते निदान पुढील श्राध्ददिनी वाचकांच्या हाती पडेल अशी आशा आहे. प्रस्तुत प्रसिध्द होत असलेले हे गोखलेचरित्र अगदी त्रोटकही नाही आणि अगदी सविस्तरही नाही, तर मध्यम आहे; आणि या दृष्टीने पाहता अशा मध्यम ग्रंथाची जरूरी सहज कळून येईल.
गोखले यांचे असे मध्यम चरित्र आपण प्रसिध्द करावे अशी रा. ताम्हनकर यांस विशेष इच्छा होती. जेव्हा रा. फाटक यांचा ग्रंथ यंदाच्या श्राध्दतिथीला प्रसिध्द होत नाही असे कळले तेव्हा ही त्यांची आतुरता वाढली. परंतु यावेळी श्राध्दतिथीला उणापुरा एक महिना सुध्दा उरला नव्हता. एवढया अत्यल्प अवधीत चरित्र लिहून प्रसिध्द कसे व्हावे ही अडचण होती. गोष्टीत गोष्ट निघताना मी रा. पां. स. साने, एम. ए. यांच्या एतद्विषयक हस्तलिखित माहिती रा. ताम्हनकर यांस दिली. मुंबई युनिव्हर्सिटीने गोखले -चरित्रावर मराठीत निबंध लिहून पाठविणारा बक्षीस लाविले आहे. आणि त्यासाठी दुस-या एक दोन होतकरू लेखकांप्रमाणे रा. साने हेही प्रयत्न करीत होते असे मला ठाऊक होते. ठराविक मुदतीत रा. साने यांजला आपले काम संपविता आले नाही, तेव्हा त्यांचा चरित्रप्रबंध त्यांजवळ पडूनच राहिला होता. पूर्वी कॉलेजात मराठी शिकत असता स्वभाषेत लेख लिहिण्याच्या कामी रा. साने यांचा हात चांगला चालत असे, असा प्रत्यय मजला आलेला होता. आणि पुढे पुण्याच्या डेक्कन व्हरनॅक्युलन ट्रान्स्लेशन सोसायटीने लोकहितवादींचे मराठी चरित्र बक्षीस लावून मागितले असता रा. साने यांनी ते तयार करून मजला दाखवून सदरहू सोसायटीकडे धाडले होते. त्यावरून त्यांच्या लेखनकौशल्यविषयीचा माझा अनुकूल ग्रह दृढतरच झाला. अखेर या लोकहितवादी चरित्राबद्दल त्यांस दुस-या एका विद्वानाच्या बरोबरीने बक्षिसाचा वाटा मिळाला. तेव्हा ते चरित्र छापविण्याविषयी मी त्यांस आग्रह केला होता. इतक्यात त्यांनी गोखले - चरित्राकडे आपले लक्ष लावले. रा. साने हे आमच्या न्यू पूना कॉलेजातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सर्वमान्य झालेले होते. त्यांची बुद्दी कुशाग्र होती. तसेच त्यांचे मन अत्यंत सुविनीत होते. असा विद्यार्थी, मराठी भाषेसाठी विद्यापीठाने थोडीशी वाव कोप-यात दिली असता मायभाषेवरील प्रेमाने तिच्या स्वागतार्थ पुढे आला याचे मजला त्या वेळी कौतुक वाटले व आज या चरित्रग्रंथाचा पुरस्कार करताना प्रेम आणि अभिमान यांची या कौतुकात भर पडली आहे. किंबहूना ग्रंथपरिचयाचे हे दोन शब्द लिहिण्याचे पत्करण्यास हा ओढाच सर्वांशी कारण झाला आहे.
महाराष्ट्रातील थोर पुरुषांची चरित्रे लिहिण्याकडे व वाचण्याकडे लोकांची प्रवृत्ती सांप्रत बरीच वळलेली दिसत. रा. नरसोपंत केळकर यांनी टिळकचरित्राचा एक सुंदर व मोठा खंड नुकताच प्रसिध्द करून आपणावरील जबाबदारी निम्मी पार पाडली आहे. रा. फाटक यांनी रानडेचरित्रावर एक विस्तृत ग्रंथ प्रसिध्द केला आहे, व द्वितीयावृत्तीच्या समयी ती दुप्पट मोठी होईल असे दिसते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चटकदार चरित्र पूर्वीच त्यांच्या बंधूंनी लिहिलेले लोकप्रिय झाले आहे. आगरकर यांचे मात्र चांगले सविस्तर चरित्र अद्यापि झाले नाही. परंतु तीही उणीव तरुण पिढीतील एक विद्वान लेखक भरून काढण्याच्या विचारात आहेत असे परवा ऐकण्यात आले. सार्वजनिक काकांचे चरित्रही एका साक्षेपी लेखकाने लिहून तयार केलेले नुकतेच पाहण्यात आले आहे. नाना मोरोजी, जगन्नाथ शंकरशेट, शाहू छत्रपती ह्यांची चरित्रेही आजवर छापून निघाली आहेत. महात्मा गांधी यांची निदान तीन मोठी चरित्रे मराठीत झाली आहेत. बंडुनाना रानडे, नूलकर, विश्राम, कुंटेप्रभृतींची छोटी चरित्रे कै. वामनराव रानडे यांनी लिहिलेली होती. त्यांतील एक चरित्रपंचक हल्ली बहुतेक छापून झाले आहे. देव मामलेदार, केतकर, अण्णा किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, कीर्तने, राजाराम रामकृष्ण भागवत, गुलाबराव महाराज, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुपंत छत्रे, बापू मेहेंदळे, अक्कलकोटस्वामी इत्यादिकांचीही काही फुटकळ व काही विस्तृत चरित्रे मराठीत छापली आहेत. तेलंग, अण्णासाहेब पटवर्धन यांची चरित्रे लिहिण्याची उचल वर्षातून त्यांची श्राध्दतिथी साजरी करताना एकदा होते; परंतु ती लिहिण्यास कोणी तरी उत्साहाने पुढे येईल असे वाटते.