नामदार गोखले-चरित्र 73
कौन्सिलातील कामगिरी
हा दौरा संपल्यानंतर त्यांस विसावा घेण्यास फुरसत कोठे होती? कौन्सिलचे काम मार्च महिन्यात सुरू झाले. या वर्षी मिठावरील कर एक रुपयापर्यंत कमी केला पाहिजे अशा त-हेचे शब्द उच्चारले होते. ते म्हणतात, ''I cannot regard, and I will not regard with satisfaction or even with patience, the continuance at a high scale of a tax on a prime necessity of life.'' ते पुढे म्हणतात, ''I am glad to think that the very able and expert financial member of then Viceroy's council hopes to make further reductions in the duty, even though he cannot go so far as I should like to go, and sweep the thing away altogether.'' मोर्ले साहेबांच्या या भाषणाचा उल्लेख करून गोपाळरावांनीही मिठावरील कर पुढे मागे अजिबात नाहीसा होईल अशी आशा प्रदर्शित केली. परंतु मिठावरील कर जरी कमी झाला तरीही गरीब लोकांवर कराचे ओझे जास्त पडतेच असे गोखल्यांनी सांगितले. फॉरेस्ट कायद्यामुळे गवताची काडी व लाकडाची काटकीही गरीब लोकांस मिळणे दुरापास्त होते. गुरांस चरावयास पुरेशी कुरणे नाहीत. 'Under Forests they have been deprived of their immemorial right to free grazing and free fuel' आपल्या निर्णयसिंधूत 'वनानि गिरयो नद्यस्तीर्थान्यासतनानि च । देवखाताश्च गर्ताश्च न स्वाम्यं तेषु विद्यते॥' असा नियम दिला आहे. परंतु बड्या अंमलदारांचे अवाढव्य पगार, लष्कराचे लाड पुरविण्यासाठी होणारा अपरंपार खर्च वगैरे भरून काढण्यासाठी हे पवित्र प्रजानुरंजन- कार्य सिध्दीस, जावे एतदर्थ सध्याच्या नीतिमान सरकारने या सर्व ठिकाणी कर बसविले आहेत. यामुळे प्रत्येक गोष्टीची महर्घता वाढली आणि यामुळे 'These classes consist almost entirely of a broken exhausted peasantry, without heart and without resource, and sunk hopelessly in morass of indebtedness.' रेल्वेसंबंधी काही टीका करून मग ते आरोग्याकडे वळले. खजिन्यातील शिलकेचे हे नववे वर्ष होते. नऊ वर्षे सारखी शिल्लक पडत आहे, परंतु या शिलकेचा उपयोग बहुतेक रेल्वे वाढविण्याकडे करण्यात आला. ही शिल्लक पडते याचे कारण ''A surplus is so much more money taken from the people, either throght miscalculation or in other ways, than was needed for the requirements of the Government, and as it is not possible to return this money to the taxpayers in a direct form, what the Government is bound to do with it is to apply it to purposes which are most calculated to benefit the mass of the people.'' ही शिल्लक लोकांच्या कल्याणार्थ कशी खर्च होईल इकडेच खरे पाहिले तर सरकारचे लक्ष पाहिजे. रेल्वेच्या दळणवळणापेक्षा देशातील आरोग्य वाढविणे हे सरकारचे सहस्त्रपट अधिक जवळचे व पवित्र कर्तव्य आहे. लाखो लोक प्लेग, कॉलरा, हिवताप यांनी मरत असता, तिकडे रेल्वे बांधून काय करणार? असा सवाल गोखल्यांनी विचारला. हिंदुस्तानातील भयंकर मृत्यूसंख्या पाहून सरकारच्या चित्तास काहीच वाटू नये हे आश्चर्य होय. सरकार 'आम्ही राष्ट्रीय कर्ज वारतो' असे सांगते. परंतु इतर देशांच्या मानाने हे कर्ज काही फारसे नाही. गोखले म्हणतात, 'The further reduction of this small debt, is not a matter of urgency and can well wait, when the money devoted to it, may be far better employed in saving the lives of the people.' स्थानिक संस्थांना आरोग्य सुधारणे अशक्यप्राय आहे हेही त्यांनी स्पष्ट सांगितले. जेव्हा जेव्हा शिल्लक उरेल तेव्हा तेव्हा ती प्रांतिक सरकारात वाटावी आणि तिचा लोकांच्या आयुरारोग्यार्थ उपयोग होणे हे अत्यंत इष्ट व जरूरीचे आहे. रेल्वेसाठी निराळे कर्ज काढावे परंतु ते कर्ज शेतक-यांच्या पैशातून वारणे म्हणजे महापाप होय. रेल्वे भरभराटत आहेत, त्यांच्या नफ्यामधून हळूहळू कर्ज वारावे किंवा व्याज भरावे. परंतु गोखले म्हणतात, 'It seems to me most unfair that the loans thus raised should be supplemented by the proceeds of taxation.'
यानंतर रुप्याच्या नाण्यापासून- टांकसाळीपासून दरवर्षी होणारा पाच- सहा कोटींचा फायदा हा कशासाठी खर्च व्हायचा ते सरकारने सांगितले पाहिजे, असे सांगून गोखल्यांनी त्याच्या उपयोगाची दिशा दाखविली की, 'The Government ought to adhere to the idea of the fund merely serving as a guarantee for the maintenance of a stable exchange' सरकारने पुढील साली तरी या बाबतीत आपला विचार सांगावा असे म्हणून ते दुस-या प्रश्नाकडे वळले.
अफूचे येणारे जे उत्पन्न आहे त्यासंबंधी ते म्हणाले, 'I confess I have always felt a sense of deep humiliation at the thought of this revenue, derived as it is practically from the degradation and moral ruin of the people of China.' हिंदुस्तानने जर हा व्यापार सोडला तर त्याचे जे नुकसान होईल त्याची भरपाई करण्यासाठी, हिंदुस्तान सरकारला ब्रिटिश खजिन्यातून काही रक्कम बहाल करण्यात यावी असे जे कित्येक ठिकाणी ध्वनित करण्यात येत होते त्यासंबंधी गोखल्यांनी आपले म्हणणे सांगितले, की इंग्लडंकडून अशी मदत मिळणे हे अशक्याहून अशक्य. बरे, समजा एक वेळ हे शक्य झाले, सूर्य पश्चिमेस उगवला तरी आपणांस हा पैसा घेणे रास्त नाही. चीनवर अफूचा व्यापार लादण्यात जरी इंग्लंडने तोफबाजी दाखविली, तरी या व्यापारापासून येणारे उत्पन्न फक्त हिंदुस्तानला मिळते. आणि यासाठी हा अन्याय्य व पापमूलक पैसा कोणाकडून पैही न घेता अपाण सोडून देण्यास तयार झाले पाहिजे. 'For that would be only another name for charity-when in the interests of humanity this wretched traffic has got to be abolished.'
नंतर ते सैन्य कमी करावे या नेहमीच्या प्रश्नाकडे वळले. हिंदुस्तानातील सैन्यासंबंधी लक्षात घेण्यासारख्या चार गोष्टी असतात. शिपायाला शक्य तितका पैसा मिळावा, कारण त्यायोगे तो तडफदार व उल्लसित राहतो. नंतर हिंदुस्तानातील गो-या लोकांची सुरक्षितता. या गो-यांस आपले संरक्षण कसे आहे इकडे लक्ष देण्यास फावते, परंतु त्यासाठी गरीब लोकांवर करांचे ओझे किती पडते आहे इकडे लक्ष देण्यास त्यांस सवड नसते. नंतर एतद्देशीयांचा प्रश्न. त्यांस पैसा द्यावा लागतो, परंतु या पैशातून होणा-या सुखसोयी, हक्क वगैरे बाबतीत त्यांच्या तोंडाला पानेच पुसली जातात. आणि त्यानंतर हिंदुस्तान सरकारची दृष्टि हे चार प्रश्न आहेत.